...ती कारवाई थंड बस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:41 AM2018-05-25T00:41:30+5:302018-05-25T00:41:30+5:30
एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर नव्यानेच एक दुकान सुरु केले आहे. दुकानासमोरून अधीक्षक अभियंता जात असताना त्यांना दुकानात लख्ख प्रकाश दिसला. त्याचक्षणी त्यांनी त्या दुकानाला भेट देऊन विद्युत पुरवठ्याची पाहणी करुन कोटेशनची चौकशी केली असता कोटेशन न भरताच विद्युत पुरवठा सुरु केल्याचे उघड झाले. यातून दोन ते तीन दिवसांत कंपनीचे किती मोठे नुकसान झाले असावे ? याचा काही अंदाज नाही. यावर कारवाई तर सोडाच; परंतु हे प्रकरण दडपण्यासाठीच महावितरणकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच याच प्रकरणात एका कर्मचाºयाचे एक तृतियांश वेतन कपात करण्यात आल्याचीही गोपनीय माहिती मिळाली.
हिंगोली शहरात केवळ एकाच ठिकाणी असा प्रकार झालेला नाही. तर एका कपड्याच्याही दुकानातही जोडणी असताना मीटर गायब असल्याचे दिसून आले आहे. त्या ठिकाणी विद्युत जोडणी दिल्यानंतर तेथील एकदा नव्हे, तर दोनदा मीटर बदलले आहे. यातूनही कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असावे. यामध्ये अधिकाºयांची चूक असली तरीही त्यांना पाठीशी घालण्यासाठी लेबरवरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यावरुनच महावितरणमध्ये आलबेल कारभार सुरु आहे, हे लक्षात येते. या प्रकाराने मात्र शहरात खळबळ उडाली आहे.