वसमतला ऑक्सिजन संपला, हिंगोलीत संपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:13+5:302021-04-22T04:31:13+5:30
हिंगोली : दिवसेंदिवस कोरोनाच्या संकटाचा सामना करणे अडचणींमुळे अवघड बनत चालले आहे. वसमतचा ऑक्सिजन साठा संपल्याने ड्युरा सिलिंडरवर कारभार ...
हिंगोली : दिवसेंदिवस कोरोनाच्या संकटाचा सामना करणे अडचणींमुळे अवघड बनत चालले आहे. वसमतचा ऑक्सिजन साठा संपल्याने ड्युरा सिलिंडरवर कारभार सुरू आहे. गुरुवारी हिंगोलीचाही साठा संपणार असून तो कधी उपलब्ध होईल, याची प्रतीक्षा केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधी एकमेकांवर कुरघोडी करण्यात मश्गुल असताना वास्तव समस्यांशी लढा देण्यात प्रशासन मात्र हतबल आहे. त्यातही आरोग्य यंत्रणा तर रोज लोकांचे बाेलणे खात असून उपाय करण्यासाठी त्यांच्याकडेही औषधी पुरवठा होत नसल्याने सगळे बेहाल आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण सहा शासकीय कोरोना रुग्णालये आहेत, जेथे रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवले. यापैकी चार ठिकाणी मोठे ऑक्सिजन टँक आहेत, उर्वरित ठिकाणी केवळ साध्या सिलिंडरवर भागवले जाते. मात्र वसमतचा टँक रिकामा झाला असून हिंगोलीचा उद्यापर्यंत रिकामा होईल. पुढील दिवशी कळमनुरी व बसस्थानक हिंगोलीसमोरील कोविड सेंटरचीही हीच गत होणार आहे. त्यामुळे बुधवारी कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनचा टँक येणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयाच्या टँकची क्षमता १३ टन असून १.६ टन ऑक्सिजन आहे. औंढा रोड हिंगोली कोविड सेंटरलाही १३ टनाच्या टँकमध्ये २.८ टन साठा आहे. कळमनुरीत १३ पैकी २.१ टन साठा आहे. तर वसमतचा १० टनाचा टँक रिकामा झाला. त्यामुळे जिल्ह्यात ४९ टन ऑक्सिजनची गरज असताना उपलब्ध ६.५ टन आहे. त्यातही लहान सिलिंडर नसल्याने एका ठिकाणचा साठा दुसरीकडे नेता येत नाही. तर लहान सिलिंडरवरही रुग्णालय एका दिवसापेक्षा जास्त चालणे अवघड आहे. सध्या वसमतला हेच सिलिंडर लावून कारभार सुरू आहे.
रेमडेसिविरची मागणीच होईना
हिंगोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अपुरे इंजेक्शन भेटत असल्याचे दिसत आहे. एकतर इतर ठिकाणी शासकीय यंत्रणांनी आधीच मागणी नोंदविली आहे. शिवाय खाजगी कोविड सेंटर थेट मागणी करीत आहेत. आपल्याकडे या दोन्ही यंत्रणा स्टॉकिस्टच्या भरवशावर दवाखाने चालवित आहेत. शासकीय असो वा खाजगी स्वत: कोणतीच जबाबदारी घेत नसल्याचेच चित्र आहे. शासकीय रुग्णालयाला इंजेक्शन दिले तर लवकर देयके निघत नाहीत, ही अडचण होते. तर खाजगी कोविड रुग्णालये आपल्या रुग्णालयाच्या नावावर इंजेक्शन मागवू शकतात, असे अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त बळीराम मरेवाड यांनी सांगितले. मात्र तेही स्टॉकिस्टकडे आलेल्या इंजेक्शनवरच भिस्त ठेवून आहेत. त्यातच रुग्णांच्या तुलनेत जिल्ह्यात फक्त चारच स्टॉकिस्ट आहेत. ही संख्याही वाढविणे गरजेचे आहे.
मंगळवारी १२२ तर बुधवारी १० इंजेक्शन
मंगळवारी हिंगोली जिल्ह्याला १२२ इंजेक्शन तर बुधवारी १० मिळाले. दुसरीकडे इतर जिल्ह्यांत शेकड्यांनी नव्हे, तर हजारांनी मिळत आहेत. त्यामुळे श्रेय लाटण्याची कुरघोडी करणारे पुढारी झोपा काढत आहेत का? की फुकटचे श्रेय लाटण्यापुरतीच यांची पुढारकी उरली, असा सवाल आता केला जात आहे. सातत्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेशी संपर्कात राहून या समस्यांवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी किती झटत आहेत, हे देव जाणे. मात्र रुग्णांची व नातेवाईकांची बोंब वाढत आहे.
पुरवठा कमी पडणार नाही
याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, हिंगोली व वसमतला बुधवारी रात्री पुरवठा होईल. सध्या पर्यायी व्यवस्था वापरत आहोत. सगळीकडेच ही पर्यायी व्यवस्था आहे. ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणेच आपल्याला मिळत आहेत. तरीही वाढीव पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.