टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:29 IST2025-04-15T14:27:48+5:302025-04-15T14:29:20+5:30
मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला; बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रकल्पांतील पाणी झाले कमी

टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन
हिंगोली : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत एका आठवड्यात ६६.६० दलघमीने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यांतील तिन्ही प्रकल्पांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, पाणीटंचाई घोंगावत आहे.
पावसाळ्यात सिंचन प्रकल्पांत झालेला पाणीसाठा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी वापरला जातो. मात्र, या काळात तापमानात मोठी वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. परिणामी पाणीसाठा कमी होत जातो.
नांदेड जिल्ह्यात छोटे आणि मोठे असे एकूण १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ७२८ दलघमी एवढी असून, या प्रकल्पांत सध्या २७१.५८ दलघमी (३७.३० टक्के) पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २८३ दलघमी पाणी शिल्लक होते. आठ दिवसांत १२ दलघमी पाणी कमी झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात ९ प्रकल्प असून, त्यात मागील आठवड्यात ५५४.१७ दलघमी पाणीसाठा होता. आता तो ५०३.८६ दलघमी शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत ८ दिवसांत सर्वाधिक ५१ दलघमी पाणी कमी झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मात्र उलट स्थिती आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ३७.७४ दलघमी पाणीसाठा होता. या आठवड्यात तो ६०.५७ दलघमी एवढा झाला आहे. येलदरी प्रकल्पातील पाणी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात सोडले जाते. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातही पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या धरणात मागील आठवड्यात ५७९.६३ दलघमी पाणीसाठा होता. या आठवड्यात हा साठा ५५२.९१ दलघमी एवढा झाला आहे. या प्रकल्पातील २७ दलघमी पाणी एका आठवड्यात कमी झाले. तिन्ही जिल्ह्यांतील या प्रकल्पांमध्ये २७५०.३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या प्रकल्पांमध्ये केवळ १३८८.९२ दलघमी म्हणजे ५०.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मोठ्या प्रकल्पांतील घटलेला पाणीसाठा (दलघमीमध्ये)
प्रकल्प मागील आठवड्यात या आठवड्यात
मानार ७०.८६ ६९.०९
विष्णुपुरी ३४.६३ ३४.४८
इसापूर ५७९ ५५२
येलदरी ५२०.९८ ४७२.५८
३४ तलावांत ज्योत्याखाली पाणी
तिन्ही जिल्ह्यांतील एकूण प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्प ज्योत्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील २३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील ११ प्रकल्पांत ज्योत्याखाली पाणीसाठा आहे. ४४ प्रकल्पांमध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ३८, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी ३ प्रकल्पांचा समावेश आहे.