औंढा तालुक्यातील ५० गावांत तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:02 AM2019-05-09T01:02:47+5:302019-05-09T01:04:12+5:30
तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
औंढा नागनाथ : तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे पाणीटंचाई चा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवारी तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेत
औंढा नागनाथ तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. यातील रामेश्वर, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा व येहळेगाव सोळंके, लोहारा खुर्द, लक्ष्मण नाईक तांडा या ५ गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सांगितले. सेवालाल तांड्यात देखील टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मार्च महिना सुरु झाल्यानंतर तालुक्यातील पाणीपातळीत झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे पाझर तलाव, साठवण तलावासह सर्वच स्त्रोत आटल्याने विहिरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. तालुक्यात वडद, देवाळा तुर्क पिंपरी, सिद्धेश्वर तांडा, सावळी बै., टाकळखोपा, जलालपूर, सावळी बै.तांडा, सिद्धेश्वर, लांडाळा, रांजाळा, औंढा नागनाथ, रामेश्वर, गांगलवाडी, अंजनवाडा, देवतळा, सेंदुरसना, काठोडातांडा, पूर, दुघाळा, येडूत, काशीतांडा, मूतीर्जापूर सावंगी, दुघाळा, येडूद, लाख, आसोला तर्फे औंढा, धारखेड, रुपुर, सावळी बै., येळी सेंदूरसना, आजरसोंडा, पिंपळा, केळी, हिवरा जाटू, पारडी सावळी, उंडेगाव, अंजनवाडा, जांभळी, पाझरतांडा, या ५० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने प्रशासनाने या गावात २ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे अधिग्रहण केले आहे. अजून १० गावांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत. या प्रस्तावावरही लवकरच कार्यवाही होणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी भोसी, सिद्धेश्वर, पिंपळदरी सर्कलसह अनेक डोंगराळ भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना ३ ते ४ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. माणसांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
पालकमंत्री टंचाईच्या दौ-यावर
औंढा तालुक्यातील जवळपास गावे पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने १०१ गावांपैकी ५५ गावांच्यावर उपाय योजना केली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. आता या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे हे शासनाचा लवाजमा घेऊन पाहणी करणार आहेत. तसेच ब्राम्हणवाडा येथे सायंकाळी ५ वाजता शहीद संतोष चव्हाण यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
औंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहे
औंढा तालुका दुष्काळाने होरपळत आहे. या परिस्थिती शेतकऱ्यांना जनावरांचा संभाळ करणे कठीण झाले असून त्यांची दमछाक होत आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने या भागातील शेतकºयांवर कवडीमोल दराने जनांवरे विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील भागामध्ये चारा छावण्या उभारण्याची आवश्यकता असून या संदर्भात पालकमंत्री व शासनाकडे तशी मागणी करणार असल्याची माहिती आ.डॉ संतोष टारफे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका सोडला तर सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.