श्रीकृष्णाचे वंशज आम्ही...; कृष्णभक्तीत लीन 'या' गावात दूध विक्री होत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 05:00 PM2020-08-11T17:00:44+5:302020-08-11T17:04:10+5:30
गावात राहणारा बहुतांश गवळी समाज हा नंदवंशीय आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
- शंकर मुलगीर
पोत्रा (जि. हिंगोली) : शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, पूर्वापार कृष्णभक्तीत लीन झालेल्या कळमनुरी तालुक्यातील येहळेगावात आजही दुधाची विक्री होत नाही. गावात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोठा उत्सव साजरा केला जातो, त्यावर यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे विरजण पडले आहे.
येहळेगाव गवळी या गावात श्रीकृष्णाचे मोठे मंदिर असून दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्म, पालखी मिरवणुक, गोपाळकाला असे विविध कार्यकम यानिमित्ताने आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणू ंसंसर्गाच्या संकटाने सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. येहळेगाव गवळी येथे गायी-म्हशींचे पालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे किमान एकतरी गाय आढळून येतेच. गावात राहणारा बहुतांश गवळी समाज हा नंदवंशीय आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गायी-म्हशी पाळल्या असल्या तरी तरी येथे दूध विक्री होत नाही.
श्रीकृष्णाचे वंशज आम्ही... प्रथा सुरूच ठेवू
येहळेगाव ग्रामस्थ याबाबत सांगतात की, कृष्ण कालखंडात वृंदावनातील गवळी दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करीत असत. त्यामुळे दूध शिल्लक राहत नसल्याने बालकांना दूध मिळत नसे. भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात दूध विक्रीची प्रथा मोडण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हापासून गावात दूध विक्री करण्याचा व्यवसाय बंद झाला. येहळेगाव येथील गायी-म्हशीचे पालन करणारा गवळी समाज श्रीकृष्णाचा वंशज असल्याचे सांगून त्यांच्या प्रेमापोटी येथे आजही दूध विक्री न करण्याची प्रथा सुरूच असल्याचे सांगतो.