आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?
By रमेश वाबळे | Published: October 30, 2023 06:07 PM2023-10-30T18:07:21+5:302023-10-30T18:08:03+5:30
साटंबा येथील कुणबी महिलांनी सरकारपुढे ठेवला यक्ष प्रश्न
हिंगोली : विदर्भातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असून, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळतो. परंतु, मराठवाड्यात मात्र त्यांच्या अपत्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळत नाही हा कुठला न्याय? असा यक्ष प्रश्न हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील महिलांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारपुढे ठेवला आहे.
विदर्भात जन्मलेल्या अनेक मुलींचे विवाह मराठवाड्यातील मुलांशी झाले आहेत. लग्नानंतरही त्या मुलींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. निवडणुकीत शंभर रूपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र देवून त्या महिलांना ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविता येते. परंतु, त्यांचे पती व आपत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे असे का व्हावे? याचा कधी सरकारने ७० वर्षात विचारही केला नाही. परंतु, हे वास्तव आहे, म्हणून आज हा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही कुणबी आणि पती मराठा तर आमच्या मुलांची जात सरकारने सांगावी?, मराठा एकच असतानाही सरकारच्या नजरेत ओबीसी आणि मराठा वेगळे असतील तर अंतरजातीय विवाह शासनाच्या योजनेतंर्गत ५० हजार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचे अडीच लाख रूपये देण्यात यावेत, निवडणुकीसाठी एका बाॅन्डवर जात बदल होवू शकतो तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात बदल का होवू शकत नाही, सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अथवा सामूहिक फारकत नामा घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी साटंबा येथील कुणबी महिलांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला, पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.