वजन, मापे पडताळणीने मापात पाप करणाऱ्यांना बसला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:14+5:302021-04-23T04:32:14+5:30
हिंगोली : येथील वैध मापनशास्त्र कार्यालयाच्या वतीने वर्षभरात ९९६ व्यापाऱ्यांच्या वजन, मापांची पडताळणी करून त्यांच्याकडून २५ लाख ५२ हजारांची ...
हिंगोली : येथील वैध मापनशास्त्र कार्यालयाच्या वतीने वर्षभरात ९९६ व्यापाऱ्यांच्या वजन, मापांची पडताळणी करून त्यांच्याकडून २५ लाख ५२ हजारांची मुद्रांक फी जमा केली आहे. या कार्यवाहीमुळे मापात पाप करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
काही व्यापारी वजन, मापात खाडाखोड करून त्याद्वारे ग्राहकांना वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न करतात. यातून ग्राहकांचे नुकसान होते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने वजने, मापे, तोलन, मापन यांची नियमित तपासणी केली जाते. ठरावीक कालावधीत वजन वा मापांची तपासणी करणे बंधनकारक आहे. हिंगोली येथील वैध मापनशास्त्र कार्यालयांतर्गत वसमत वगळता इतर सर्व तालुक्याचा समावेश आहे. दरवर्षी या विभागाला वजन, मापे पडताळणी करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र कोरोनामुळे वर्षभरापासून उद्दिष्ट देण्यात आले नव्हते. तरीही या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वजन, मापांची पडताळणी करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार वर्षभरात एकूण ९९६ वेळा पडताळणी करून व्यापाऱ्यांकडून २५ लाख ५२ हजार ७९५ रुपयांची मुद्रांक फी वसूल करण्यात आली. यात किराणा दुकान, हार्डवेअर, व्यापारी प्रतिष्ठाने आदी ८९४ दुकानातील वजन, मापे पडताळणीतून ६ लाख ३८ हजार ६२० रुपयांची मुद्रांक फी, भुसार व्यापारी, मोठे वजन काटे असणाऱ्या ३२ व्यापाऱ्यांच्या दुकानातील वजन, मापांची पडताळणी केली असता यातून १ लाख ९६ हजार २७० रुपयांची मुद्रांक फी, तसेच पेट्रोल पंपांची ७० वेळा पडताळणी केली असता यातून १३ लाख ६५ हजार रुपयांची मुद्रांक फी जमा करण्यात आली आहे. तसेच उशिरा पडताळणी केल्याप्रकरणी १ लाख ९२ हजार ४५५ रुपयांची लेट फी जमा करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यवाहीमुळे मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
वजन,मापे पडताळणी कॅम्प
वजन वा मापावर वैधमापनशास्त्र विभागाचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. वर्षभरात आखाडा बाळापूर, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, जवळा बाजार, गोरेगाव, कान्हेगाव आदी ठिकाणी वजन व मापे तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आले होते. यामध्ये निरीक्षक संभाजी बिल्पे, वामन पेंदोर, सुधाकर आल्हाट, गणेश सूर्यवंशी, शिवशंकर बिघडे, प्रल्हाद सामाले, राजू सूर्यवंशी यांचा समावेश होता.
२९ व्यापाऱ्यांना दंड
वजन, मापे यांची नियमित पडताळणी करणे आवश्यक असताना या विभागांतर्गत २९ व्यापाऱ्यांनी वजन, मापे पडताळणी करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या व्यापाऱ्यांना दंड लावण्यात आला असून दंडापोटी २३ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.
हिंगोली येथील वैध मापनशास्त्र कार्यालयांतर्गत वजन, मापे पडताळणी व मुद्रांक फी म्हणून २५ लाख ५२ हजार ७९५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तसेच २९ व्यापाऱ्यांकडून २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- संभाजी बिल्पे, निरीक्षक, वैध मापनशास्त्र