छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:20 AM2018-07-16T00:20:03+5:302018-07-16T00:20:23+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती.
श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे हिंगोलीत आगमन होणार असल्याने मिरवणुकीची आधीपासूनच जय्यत तयारी सुरु होती. हिंगोली शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपतींचा पुतळा दाखल झाला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
हिंगोली शहरातील अग्रेसन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट आॅफीस, विश्रामगृह, नियोजित पुतळ्याचे ठिकाण या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध धर्माचे समाजबांधव सहभागी झाले होते.
जिल्ह्यात पुतळ्याचे आगमन होताच डोंगरकडा, वारंगाफाटा, आखाडाबाळापूर, पार्डी मोड यासह विविध मार्गावरून पुतळ्याचे आगमन होताच शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. हिंगोलीत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. अखेर यावर्षी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जात आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध कारागीर संताजी चौगुले यांनी हा पुतळा तयार केला आहे. आकर्षक असा शिवरायांचा हा पुतळा ब्रॉंझचा आहे. कोल्हापूर येथून हा पुतळा हिंगोलीकडे आणण्यात आला.