भाजपच्या आश्वासनांचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:25 AM2018-11-17T00:25:07+5:302018-11-17T00:25:21+5:30
आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांचा संकल्प सिद्धी अहवाल प्रकाशित केला असला तरीही त्यात भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा लवलेशही नसून हा अहवाल एक दिशाभूल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांचा संकल्प सिद्धी अहवाल प्रकाशित केला असला तरीही त्यात भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा लवलेशही नसून हा अहवाल एक दिशाभूल असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुनीर पटेल म्हणाले, यात आमदारांनी आपल्या निधीसह कयाधू नदीसंदर्भातील पत्रांचाच उहापोह केला. त्यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणले, ही बाब वगळली तर इतर सर्व पत्रव्यवहारच आहे. माजीमंत्री दांडेगावकर यांनी यापूर्वीच पाणी उपलब्धता आणली होती. मात्र त्यातून होणारी कामे पुढे भाजप सरकारने का केली नाही? असा सवालही केला. परंतु भाजपाने सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने दिली होती, त्याची कुठेच या अहवालामध्ये पूर्तता झाल्याचे दिसत नाही. किंबहुना त्याचा साधा उल्लेखही नाही. मुळात हा अहवाल कोणत्याही गांभिर्याने केला नाही, हे दिसत आहे. त्यामुळेच त्यात एटीएम फोडून २0 लाख पळविल्याची असंबंध बातमीही आल्याचे ते म्हणाले. यावेळी बी.डी. बांगर यांनीही छत्रपतींचा पुतळा, नर्सी नामदेव येथील मंदिराच्या मुद्यावरून आ.मुटकुळे यांच्यावर टीका केली. लोकवर्गणीतील कामेही स्वत:च्या नावाने खपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.
विरोधकांचे डोळे दिपले असतील-मुटकुळे
मी माझ्या वैयक्तिक स्तरावर केलेल्या विकासकामांचाच आढावा दिलेला आहे. पक्षस्तरावरील आढावा पक्षाकडून दिला जाईल. कदाचित होत असलेली कामे व त्यातील निधीचे आकडे पाहून विरोधकांचे डोळे दिपत असतील. त्यामुळे असे दुधखुळे आरोप करून वेळ वाया घालविण्याची कामे ही मंडळी करीत आहे. या पोपटपंची करणाऱ्यांमागचा बोलवता धनी वेगळा असला पाहिजे. त्यांनीच थेट समोर आल्यास विकास की दिशाभूल हे सांगता येईल, अशी प्रतिक्रिया आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.