मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:39+5:302021-06-05T04:22:39+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. मोबाइल दुरुस्तीसारख्या कामासाठीही नागरिक घराबाहेर पडत ...
हिंगोली : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. मोबाइल दुरुस्तीसारख्या कामासाठीही नागरिक घराबाहेर पडत असल्याने गर्दी वाढत आहे. गर्दीमुळे कोरोनाला पुन्हा आमंत्रण मिळू नये म्हणून मोबाइल विक्री व दुरुस्ती दुकानदार मात्र दुकानात गर्दी होणार नाही, याकडे लक्ष देत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढविली. रुग्णांचा चढता आलेख बघता प्रशासनाने वेळीच उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात कुठेही कडक निर्बंध लागू झाले नसताना हिंगोलीत मात्र संचारबंदी लागू केली होती. सलग दोन ते अडीच महिने झाले, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना निर्बंध घालण्यात आले होते. आता कुठे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यातही काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, नियम शिथिल करण्यात आल्याने घरात थांबलेले नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मोबाइल खरेदी व दुरुस्तीसाठीही नागरिकांची दुकानात गर्दी होत आहे. मात्र, ही गर्दी पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही मोबाइल विक्री व दुरुस्ती दुकानदारांनी दुकानात गर्दी होणार नाही, यासाठी काळजी घेण्यास सुरुवात केली. दुकानात एका वेळी एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जात असला तरी नागरिकांनीही मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक बनले आहे.
कारण काय?
- मोबाइलचा डिस्प्ले बदलून घेणे.
- गोरिला ग्लास बसविणे.
-चार्जिंग लवकर उतरत असल्याने दुरुस्ती.
- पाण्यात मोबाइल भिजणे.
- मोबाइलवर आवाज व्यवस्थित ऐकू न येणे.
तीन महिन्यांपासून बाजार बंद
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवस निर्बंध शिथिल केले. मात्र, पुन्हा शासनाने कडक निर्बंध घातले. त्यामुळे जवळपास तीन महिने अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ ठप्प होती.
मोबाइल विक्री व दुरुस्ती दुकानेही बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोबाइल विक्री व दुरुस्ती दुकाने तीन महिने बंद होती. आता दिवसाआड दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यातही शनिवार, रविवार पूर्णत: बाजारपेठ बंद राहत आहे. त्यामुळे आठवड्यात तीन दिवसच दुकाने उघडी राहत आहेत.
तीन महिन्यांनंतर उघडले शटर
कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून मोबाइल दुरुस्ती दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानाचे भाडे, लाइट बिल थकले आहे. आता कोरोनाचे नियम पाळून दुकान दिवसाआड दुकाने उघडण्यात येत आहेत.
- गोपाल बाहेती, दुकानदार
मोबाइल दुरुस्ती व विक्री दुकाने तीन महिन्यांपासून बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे घर चालवितानाही मोठी कसरत करावी लागली. आता दुकानाचे भाडे कसे भरायचे, याची चिंता लागली आहे.
- अजय चांदूरकर, दुकानदार
मुलाला अभ्यासासाठी ॲण्ड्राॅइड मोबाइल घेतला होता. हातातून खाली पडल्याने त्याचा डिस्प्ले गेला आहे. दुरुस्तीसाठी आणला आहे.
- राहुल वाढवे
नवीन मोबाइल घेतला होता. मात्र, चार्जिंग जास्त वेळ टिकत नव्हती. त्यामुळे चार्जर घेण्यासाठी दुकानात आलो आहे.
- भीमराव पाईकराव, हिंगोली