नवखा माणूस दिसला की बदडला ! चोर समजून परप्रांतीय कामगारांना ग्रामस्थांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:01 PM2022-08-05T12:01:01+5:302022-08-05T12:04:08+5:30
पंधरा ते वीस कामगार पोलिसांच्या स्वाधीन; भोसी शिवारातील घटना
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): राष्ट्रीय महामार्गावर मजुरी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या कामगारांना देवदर्शनासाठी जाताना ग्रामस्थांनी चोरटे समजून त्यांचा पाठलाग केला व मारहाण केली. एवढेच काय पोलिसांच्या स्वाधीन केले. १५ ते २० कामगार घेऊन पोलीस ठाण्यात आले. पण ते संशयित राष्ट्रीय महामार्गावरील कामगार निघाल्याने सर्वांचा भ्रमनिरास झाला. पोलीस वेळेत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.
बाळापूर परिसरात सध्या गावोगावी चोरट्यांचे अस्तित्व आणि चोरींच्या घटनांची प्रचंड दहशत सुरू आहे. त्यामुळे रात्रभर गावोगावी जागरण सुरू आहे. नवखा माणूस दिसला की चोरटे समजून त्याला मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भोसी शिवारात चोरटे आल्याची वार्ता पसरली. सर्व ग्रामस्थ एकमेकांना सांगत चोरट्यांचा पाठलाग केला. भोशी शिवारातील माळरानावर पंधरा ते वीस चोरट्यांना ग्रामस्थांनी घेरले व त्यांना मारहाण केली. पोलिसांना फोन करून चोरटे पकडल्याचे सांगितले. तातडीने बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सदर संशयित चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता सर्व संशयित हे राष्ट्रीय महामार्गावरील कामगार असल्याचे निष्पन्न झाले.
पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेले हे सर्व कामगार सध्या नांदेड ते हिंगोली या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर कामगार म्हणून आले आहेत. गुरुवारी सकाळी बाळापूर परिसरात पाऊस झाल्याने दिवसभर महामार्गाचे कामकाज बंद होते. काम बंद असल्याने रिकामपण मिळाल्याने विरंगुळा म्हणून या कामगारांनी देवदर्शनासाठी जावे म्हणून माळावरील असलेल्या मंदिराकडे जात होते. कामगाराच्या वेशातले हे तरुण मंदिराकडे माळवाटेने जात असताना कोणीतरी पाहिले. अनोळखी तरुण टोळीने फिरत असल्याची चर्चा सुरू झाली. चोरटे असल्याचीही अफवा उडाली. अतिहुशार उत्साही तरुणांनी घाई करत या तरुणांचा पाठलाग केला व कामगारांना चारी बाजूने घेरले. काहींनी पोलीस येईपर्यंत हात साफ केला. गावचे पोलीस पाटीलांनी तातडीने बाळापूर पोलिसांना ही खबर कळवली.
ठाणेदार पंढरीनाथ बोधणापोड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पीएसआय श्रीधर वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
ग्रामस्थांच्या तावडीतून पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर कामगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे आधार कार्डही तपासले. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराचे दातीफाटा या ठिकाणी असलेल्या कॅम्पमध्ये ते राहत असल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे काम बंद असल्यामुळे विरंगुळा म्हणून देवदर्शनासाठी ते फिरत होते. तेवढ्यात ग्रामस्थांनी त्यांना पाहिले आणि बदडून काढले. त्यामुळे त्यांना देवदर्शन चांगलेच महागात पडले. सर्वांना घेऊन बाळापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. आधारकार्ड पाहून कंत्राटदाराशी चर्चा करत त्यांना सोडून देण्यात आले.
अफवा पसरवू नका आणि कायदा हातात घेऊ नका ...
सध्या चोरांच्या अफवांनी सर्वत्र दहशत माजवली आहे. लोक रात्रभर जागरण करत आहेत. जागृत राहणे ही चांगली बाब असली तरी अनोळखी माणसाला मारहाण करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे कोणीही मारहाणीचे कृत्य न करता पोलिसांना याबाबत खबर द्यावी. चोरांपासून जागृत रहावे. परंतु जमावामध्ये एखादी अप्रिय घटना घडू नये, याची खबरदारी घ्यावी.
-पंढरीनाथ बोधनापोड, ठाणेदार