मिशी कधी काढणार? भर सभेत दिलेले चॅलेंज आमदार संतोष बांगर यांच्या अंगलट
By विजय पाटील | Published: May 2, 2023 06:39 PM2023-05-02T18:39:40+5:302023-05-02T18:42:52+5:30
''सतरापैकी सतरा जागा निवडून नाही आणल्या न तर मिशी ठेवणार नाही. हं...आपल्याकडे ते काही जमतच नाही.''
हिंगोली : नुकत्याच बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यात कळमनुरी बाजार समितीत १७ पैकी १७ जागा निवडून न आल्यास मिशी ठेवणार नाही, अशी वल्गना आ.संतोष बांगर यांनी जवळा बाजार येथे प्रचारात केली होती. आता त्यांच्या पॅनलच्या पाचच जागा आल्याने हा व्हिडीओ व्हायरल केला जात असून मिशी कधी काढणार? असे उपहासात्मकरीत्या विचारले जात आहे.
आ.संतोष बांगर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिले आहेत. यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र तरीही त्यांची बेधडक वाणी कानी पडायचे थांबले नाही. शिंदे गटाची भाजपसोबत युती असल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे त्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा घेतली. भाषणादरम्यान त्यांना चांगलेच स्फुरण चढले. यावेळी बोलताना ते म्हणाले, फक्त भाजप आमच्या सोबत आहे. बाकी राष्ट्रवादी, उरली सुरली शिवसेना, काँग्रेस वंचित हे सगळे एक झाले. पण आजही तुम्हाला सांगतो, नागनाथाच मंदिर येथे समोर आहे. सतरापैकी सतरा जागा निवडून नाही आणल्या न तर मिशी ठेवणार नाही. हं... आपल्याकडे ते काही जमतच नाही. म्हणूनच सांगतो १७ पैकी १७ जागा आणणार, असा दावा त्यांनी केला होता.
कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीच्या १२ तर शिवसेना व भाजप युतीच्या ५ जागा आल्या. त्यातही शिंदे गटाच्या तीनच आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करून विरोधक आ.संतोष बांगर यांना डिवचत आहेत. मिशी कधी काढणार? अशी विचारणा केली जात आहे.