अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:44 PM2020-10-30T18:44:38+5:302020-10-30T18:47:14+5:30
अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था
- सुनील काकडे
हिंगोली : जिल्ह्यात ७११ गावे आहेत. त्यातील तब्बल १५६ गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. त्यामुळे मृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतांमध्ये उघड्यावर चिताग्नी दिला जातो; मात्र पावसाळ्यात सरणावर पाणी पडून ते वारंवार विझण्याचा प्रकार घडतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्या गावांमध्ये स्मशानभूमी आहे, त्यातीलही अनेक ठिकाणच्या स्मशानभूमीतील टिनशेडची दुरवस्था झाली आहे.
हिंगोली तालुक्यात ४३, सेनगाव तालुक्यातील २५, वसमत ३२, औंढा नागनाथ २६ आणि कळमनुरी तालुक्यातील ५० गावांमध्ये आजही स्मशानभूमीची व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात हा त्रास अधिकच बळावतो. प्रशासकीय यंत्रणेने ही बाब लक्षात घेता सुविधांयुक्त स्मशानभूमी उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.
मु.पो. सवना, ता. सेनगाव
सेनगाव तालुक्यातील सवना या गावात बौद्ध आणि बंजारा समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र हिंदू समाजबांधवांकरिता अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. काही महिन्यांपूर्वी या समाजासाठी स्मशानभूमीची जागा आरक्षित करण्यात आली आहे. असे असले तरी त्याठिकाणी टिनशेड किंवा बैठक व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. यामुळे विशेषत: पावसाळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वधर्मियांकरिता स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; परंतु दुर्लक्ष करण्यात आले.
मु.पो. अंभेरी, ता. हिंगोली
हिंगोली तालुक्यातील अंभेरी येथे एकाठिकाणी मुस्लिम समाजबांधवांसाठी स्मशानभूमीची थोडीफार जागा उपलब्ध करून देण्यात आली. हा अपवाद वगळता अन्य समाजांकरिता आजही स्मशानभूमीची कुठलीच सोय उपलब्ध नाही. यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास ओबडधोबड रस्त्याने अंत्ययात्रा काढून मृतकांवर शेतात उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशात पाऊस झाल्यास सरणावर पाणी पडून ते वारंवार विझत असल्याने मृत्यूनंतर मृतदेहांची यामुळे अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिक करित आहेत.
जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचा विकास करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी उभारण्यात आलेली नाही, अशा गावांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल.
- आर.बी. शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी