कुठे चौकी तर कुठे पोलीसच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:02 AM2018-05-23T01:02:54+5:302018-05-23T01:02:54+5:30
सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सार्वजनिक व संवेदनशिल ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचावी यासाठी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आल्या. मात्र सुविधांविना काही गायब झाल्या तर कुठे चौकी असूनही पोलीस कर्मचारी बसत नसल्याचे चित्र आहे.
हिंगोली शहरातील मुख्य असलेल्या महात्मा गांधी चौकातील सार्वजनिक ठिकाणची पोलीस चौकी तर गायबच झाल्याचे चित्र आहे. शहरातील वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे तसेच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी चौकीची व्यवस्था करण्यात आली होती. या चौकीत तीन ते चार कर्मचारी सुसज्ज यंत्रणेसह कर्तव्य बजावत होते. पंरतु मागील काही महिन्यांपासून गांधी चौकातील पोलीस चौकी गायब असल्याचे दिसून येत आहे. तसेच रिसाला बाजार, जुने ग्रामीण पोलीस ठाणे परिसरातीलही चौकीसह कर्मचारीही गायब आहेत. तर हिंगोली बसस्थानकात चौकीच नसल्याने पोलीस कर्मचारी हॉटेल किंवा इतरत्र बसतात. त्यामुळे पोलीस चौक्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
शहरातील गांधी चौकात व्यापाऱ्यांकडून पोलीस चौकी उभारणीसाठी प्रयत्न केले जात होते. परंतु अद्याप या ठिकाणी चौकीची सुविधा झाली नाही. त्यामुळे असलेली चौकीही गायब झाली आहे.
पोलीस चौकींची सुविधा करून दिल्यास त्या ठिकाणी कर्मचारी पाठवू, परंतु कर्मचाºयांना बसण्याची सुविधाच नसल्याने ते कर्तव्य कसे बजावतील, असे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी चौकी उभारण्यात आली तर येथे पोलीस बंदोबस्त असतो. अनुचित प्रकाराला आळाही बसतो.