ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल
By विजय पाटील | Published: November 26, 2023 06:39 PM2023-11-26T18:39:48+5:302023-11-26T18:39:55+5:30
'मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध; एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या.'
हिंगोली: मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केली. रामलीला मैदानावर झालेल्या या सभेस प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, खा.रामदास तडस, आ. प्रज्ञा सातव, आ. राजेश राठोड, टी. पी. मुंडे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. रामराव वडकुते, बबन तायवाडे आदी ओबीसी नेते उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, मी बोललो तर दोन समाजात तेढ निर्माण करू नका म्हणतात. पहिल्यांदा तर ते बोलले. तुमचा खुटा उपटील म्हणाले. करे कर काय करायचे ते? तरीही आम्ही बोललो नाही. आम्हाला दोन महिन्यांपासून रोज शिव्या घालताहेत. पोलिसही ते वाचू शकले नाहीत. जाळायला अक्कल लागत नाही जोडायला अक्कल लागते.
ओबीसीविरुद्ध षडयंत्र
एकीकडे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात दाद मागत आहेत. जे ओबीसीत आहेत, ते कसे चुकीचे आहेत, असे सांगून आमचे काढून त्यांना आरक्षण मागण्याचा डाव आहे, असेही भुजबळ म्हणाले.
ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला?
उपोषण नेते म्हणतात की, ओबीसींच्या हाताखाली काम करणे शोभत नाही. आमची लायकी नाही. याच नेमकं म्हणनं तरी काय? हे मराठा नेते का विचारत नाहीत. लायकी होती म्हणूनच अठरा पगड जातीतील शूरवीर छत्रपती शिवरायांसोबत लढले. ओबीसी देशाचा निर्माता आहे. शिवाय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी उमेदवार ओपनच्या बरोबरीची किंबहुना त्यापुढेही गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचे सांगताना त्यांनी आकडेवारीचा दाखलाच भुजबळ यांनी दिला.
मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध
मराठा समाजाला वेगळे १२, १५ टक्के आरक्षण द्या. त्यासाठी आमच्यावर बुलडोझर चालवू नका. आमचा गरीब मराठ्यांना विरोध नाही. मात्र जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. अंतरवाली प्रकरणातील आरोपी बेदरेकडे पिस्तूल आढळले. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. जर कुणाला गावबंदी केली तर एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. मग पोलिसांनी आतापर्यंत कुणावरच का कारवाई केली नाही? असा सवालही भुजबळ यांनी केला.
एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या
राहुल गांधी, शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळीच मंडळी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. येथेही अनेकांनी केली. एकदा अशी गणना होऊनच जाऊ द्या. बिहार अशी गणना करू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत? असा सवालही भुजबळ यांनी केला.