खासदारांना नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? शिवसेना संपर्क नेते जाधव जाब विचारणार

By विजय पाटील | Published: December 11, 2023 07:26 PM2023-12-11T19:26:30+5:302023-12-11T19:26:36+5:30

विभागीय संपर्क नेते आनंद जाधव हे खासदार हेमंत पाटलांच्या पाठीशी

Who is the guardian minister who calls MPs drama? dispute in Shiv Sena in Hingoli | खासदारांना नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? शिवसेना संपर्क नेते जाधव जाब विचारणार

खासदारांना नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? शिवसेना संपर्क नेते जाधव जाब विचारणार

हिंगोली : आपल्याच पक्षातील माणसाने निष्ठेने समाजाची सेवा केली. मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्याला नौटंकी म्हणणारा कोण तो पालकमंत्री? खा. हेमंत पाटील यांच्याबद्दल असे वक्तव्य केल्याने त्याचा जाब अब्दुल सत्तार यांना विचारणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे विभागीय संपर्कनेते आनंद जाधव यांनी येथे पक्षाच्या आढावा बैठकीत केले.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीस खा. हेमंत पाटील, लोकसभा निरीक्षक सुभाष सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख आशिष गुलावडे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, श्रीराम बांगर, संजय बोंढारे, राजू चापके, धनंजय दातीकर, रेखा देवकते आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाधव म्हणाले, मंत्री म्हणून सत्तार यांनी तारतम्याने बाेलले पाहिजे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे चुकीचे काही मनाला पटत नाही. खा. पाटील यांनी राजीनामा दिला. एक दिवस उपोषण केले. आजही ते समाजाचे काम करतात. त्यामुळे सत्तार हे शिंदे गटाचे असले तरीही त्याबद्दल जाब विचारणारच आहे, तसेच वरिष्ठ नेतेमंडळींच्या कानावरही ही बाब टाकणार आहे. विभागीय संपर्क नेता म्हणून मला तो अधिकार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले, तर खासदार, आमदार काम करीत आहेत आणि पदाधिकारी झोपेत आहेत, असे चालणार नाही. शिवदूत नेमा, शाखा उघडा, बुथप्रमुख नेमा. आगामी महिन्याभरात प्रत्येक तालुक्यात दहा हजार सभासद नोंदणी न झाल्यास निष्क्रिय लोकांना दूर सारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेत जुंपणार?
मागील काही दिवसांपासून शिवसेनेची मंडळीच जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या मुद्यावरून आक्रमक आहे. एवढेच काय तर औंढा न.पं.मध्ये शिंदे गटाची सत्ता असताना गेल्यावर्षी मंजूर नियतव्यय मिळाले नाही. यंदाही तशी शक्यता नसल्याने ओरड आहे. इतरांचीही तीच बोंब आहे. त्यामुळे शिवसेनेतच जुंपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पालकमंत्र्यांना आतापर्यंत कोणी जाब विचारण्याची भाषा केली नव्हती. आता या सर्व बाबींवरही जाब विचारला जाईल का? असा सवाल शिवसैनिकच करू लागले आहेत.

Web Title: Who is the guardian minister who calls MPs drama? dispute in Shiv Sena in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.