हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान
By रमेश वाबळे | Published: October 21, 2022 12:31 PM2022-10-21T12:31:44+5:302022-10-21T12:32:45+5:30
पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले.
हिंगोली : शहरातील रामलिला मैदान भागातील एका होलसेल किराणा दुकानाला आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
हिंगोली शहरातील रामलिला मैदानाच्या परिसरात शोएब कच्छी यांचे होलसेल किराणा दुकान आहे. किराणा साहित्यासोबतच इतर कटलरी साहित्य विक्री केले जाते. २० ऑक्टोबरच्या रात्री नेहमी प्रमाणे कच्छी हे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती इतर नागरीकांना दिली. मात्र, बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. दुकानाच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह अग्नीशमनदलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग भडकल्याने तातडीने सेनगाव, कळमनुरी, वसमत येथील अग्नीशमनदलास पाचारण करण्यात आले. या अग्नीशमन दलाचे पथक तसेच नागरीकांच्या मदतीने तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तो पर्यत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.