डॉक्टरला बोलावण्यासाठी वेळ का लागला? विचारत आरोग्य कर्मचाऱ्यास तिघांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:42 AM2023-07-31T11:42:52+5:302023-07-31T11:43:14+5:30
सेनगाव तालुक्यातील साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
सेनगाव : डॉक्टरला बोलावण्यासाठी वेळ का लावला? असे विचारत रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सेनगाव तालुक्यातील साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० जुलै रोजी रात्री ७:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरूद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सेनगाव तालुक्यातील साखरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ३० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आरोग्य कर्मचारी दिलीप नामदेव हाके व इतर कर्मचारी कर्तव्यावर होते. यावेळी तालुक्यातील साखरातांडा येथील सचिन राठोड व इतर दोघे जण प्राथमिक आरोग्य केंद्रात एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन आले होते. रुग्णाची प्रकृती पाहून कर्मचारी तातडीने डॉक्टरला बोलावण्यासाठी गेले होते. मात्र डॉक्टरला बोलावून आणण्यासाठी वेळ का लागला ? असे म्हणत सचिन राठोड आणि इतर दोघांनी हाके यांना शिवीगाळ केली. त्यांचा शर्ट फडत मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी हाके यांनी सेनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून सेनगाव पोलिसांनी सचिन राठोडसह तिघांवर (रा. साखरातांडा) सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक वग्गे तपास करीत आहेत.