गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:47+5:302021-07-19T04:19:47+5:30
हिंगोली : गाव तिथे एसटी हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांना कोरोनाने ब्रेक लावला होता. आता कोरोनाचे ...
हिंगोली : गाव तिथे एसटी हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांना कोरोनाने ब्रेक लावला होता. आता कोरोनाचे संकट कमी झाले असून एसटी पुन्हा धावत आहे. मात्र, शहरी भागातच फेऱ्या सोडल्या जात असून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्या ग्रामीण भागात एकही बस मुक्कामी थांबत नाही.
कोरोनाने एसटीची चाके आगारात रुतली होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाले असून एसटी महामंडळाने बस पुन्हा सुरू केल्या आहेत. हिंगोली आगारातून सद्य:स्थितीत लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम व साध्या बस धावत आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून आजघडीला २०६ फेऱ्या शहरी भागात सोडल्या जात आहेत. यातून हिंगोली आगाराच्या उत्पन्नात भर पडत आहे. बसफेऱ्या सुरू झाल्याने शहरी भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात एकही बस सुरू नाही. कोरोनापूर्वी ग्रामीण भागात १५ बस मुक्कामी थांबत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टळत होती.
खेडेगावात जाण्यासाठी ऑटोचा आधार
हिंगोली आगारातून ग्रामीण भागात एकही बस मुक्कामी सोडली जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना ऑटोरिक्षा, जीपचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात जास्त प्रवासी मिळाले तरच जीप, ऑटोरिक्षा जागेवरून हलतो. अन्यथा अनेक तास ताटकळत थांबावे लागते.
१८ हजार कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहरांचाच !
हिंगोली आगारातून आजघडीला पूणे, कोल्हापूर, हैदराबाद, सोलापूर आदी लांब पल्ल्यासह परभणी, अकोला, वाशिम, नांदेड या मार्गावर बस फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. दिवसभरात जवळपास १८ हजार कि.मी.चा प्रवास एसटी करते. मात्र, हा प्रवास केवळ शहरांचाच आहे. ग्रामीण भागात एकही फेरी नाही.
खेडेगावांवरच अन्याय का?
कोरोनापूर्वी हिंगोली आगारातून गोरेगावसाठी दररोज तीन फेऱ्या होत होत्या. त्यामुळे जिल्ह्याला यायचे झाल्यास ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळत होता. आता बसफेरी बंद असल्याने जीपचा आधार घ्यावा लागत आहे. जीपचालकही जास्त प्रवासी आले तरच जागेवरून हलतो.
- राहुल वाकोडे, गोरेगाव
हिंगोली आगारातून मौजा मार्गावर बस धावत होती. मात्र, कोरोनामुळे बस फेरी बंद झाली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा, जीपमधून हिंगोली गाठावे लागते. शहरी भागात बसफेऱ्या सुरू झाल्या. आता ग्रामीण भागातही एसटी सुरू करावी.
- गजानन घुगे, अंभेरी
परवानगीची प्रतीक्षा
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी सध्या लांब पल्ल्याच्या बस धावत आहेत. ग्रामीण भागात बस सुरू करण्यासंदर्भात अद्याप तशा सूचना आगाराला मिळाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवासी संख्या जास्त असतानाही बस सुरू करण्यासंदर्भात मर्यादा येत असल्याचे आगारातून सांगण्यात आले.
हिंगोली आगारातील एकूण बस - ५६
कोरोनाआधी दररोज फेऱ्या - २५०
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - २०६