'आज इथं उद्या मुंबईत राडा करू'; पीकविम्यासाठी कंपनीच्या कार्यालयात 'स्वभिमानी'कडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 03:03 PM2022-02-02T15:03:40+5:302022-02-02T15:05:56+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याची मागणी होत आहे.
हिंगोली : पीकविम्याची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी एचडीएफसी एर्गो पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हिंगोलीच्या एनटीसीत घडली.
मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याची मागणी होत आहे. यासाठी यापूर्वी कृषी अधीक्षक कार्यालयातही आंदोलन केले. मात्र ढिम्न कृषी अधीक्षकांनी यात काहीच आश्वासन दिले नव्हते की पीकविमा कंपनीलाही यावरून फटकारले नाही. परिणामी, आता शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पीकविमा कंपनीच्या कार्यालयाकडेच वळविला. या कार्यालयात जावून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पीकविमा खात्यावर कधी जमा होणार? याची विचारणा केली. मात्र या ठिकाणी उपस्थितांनी यावर काहीच उत्तर दिले नाही. परिणामी, संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे साध्या वेशातील शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
याबाबत नामदेव पतंगे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलने केली. मात्र निगरगट्ट झालेली कंपनी दमडीही देत नाही. कृषी अधीक्षक कार्यालयातही आंदोलन केले. येथे विचारणा केली तर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवण्याचे धंदे सुरू आहेत. आज येथे तोडफोड केली, उद्या मुंबईचे कार्यालय फोडू, असा इशाराही दिला.