संविधानविरोधी काम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल : चंद्रशेखर आझाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 08:04 PM2019-01-03T20:04:09+5:302019-01-03T20:06:24+5:30
भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे.
हिंगोली : भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे. परंतु, भीमआर्मी हे कदापि खपवून घेणार नाही. तसेच देशात संविधानाविरूद्ध कोणी काम करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा भीमआर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
हिंगोली मार्गे अमरावतीकडे जाताना भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी येथे धावती भेट दिली. शहरात त्यांचे आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आझाद म्हणाले, भीमआर्मी शोषित व पिडितांवर होणाऱ्या अन्याविरूद्ध लढा देत आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. भीमआर्मीच्या वाढत्या ताकदीमुळे भाजप सरकाने धसका घेतला आहे. यामुळेच पोलिसांच्या नजरकैदेत ठेवणे, सभेवर बंदी आणणे असे संविधान विरोधी कृत्य सरकार करत आहे. तसेच भीमाकोरेगाव दंगलीतील आरोपी आजही मोकाट फिरत असून सरकार मुग गिळून गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.
भीमआर्मी सामाजिक संघटन
आगामी निवडणूक संदर्भात आझाद यांनी स्पष्ट मत व्यक्त केले नाही. मात्र, भीमआर्मी हे एक सामाजिक संघटन आहे असे ते म्हणाले. तसेच ‘जो बहुजनो की बात करेगा वही दिल्ली पे राज करेगा’ असे उत्तर त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना दिले. यावेळी भीमआर्मीचे दीपक भालेराव, राहूल पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.