अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:51+5:302021-05-28T04:22:51+5:30
हिंगोली : आता कृषी विभागाचा हायटेक कारभार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला असून शेतकऱ्यांना महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. ...
हिंगोली : आता कृषी विभागाचा हायटेक कारभार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला असून शेतकऱ्यांना महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. बियाण्यांसह इतर बाबींसाठी शेतकऱ्यांनी तब्बल ४४ हजार ३३८ अर्ज केले असून आता सोडत कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या वेळी यांत्रिकीकरण व इतर योजनांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्याने शेतकऱ्यांच्या गाठीशी चांगला अनुभव आला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना या ऑनलाईनमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळही येत आहे. जे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाशी अवगत आहेत, त्यांनाच याचा फायदा होताना दिसत आहे. तरीही जिल्ह्यातून आलेले अर्ज पाहता शेतकऱ्यांचा या योजनांकडे किती कल आहे, हे लक्षात येते. एवढ्या मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांची आस लागल्याचे दिसून येत आहे. या अनुदानित बियाण्यांची सोडत निघाल्यानंतर परमिट देण्यात येणार आहे. मात्र आता ही प्रक्रिया वेळेत होणार की कसे? याची चिंता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. पुण्याहून सोडतीची प्रक्रिया होणार असून कृषी सहायकांकडे त्यांच्या याद्या येणार आहेत.
जिल्ह्यात ४४३३८ अर्ज
हिंगोली जिल्ह्यातून महाडीबीटी पोर्टलवर तब्बल ४४ हजारांवर अर्ज गेले आहेत.
यामध्ये सर्वाधिक अर्ज हे प्रामाणित बियाणे वितरणासाठी आहेत. त्यामुळे अनुदानित बियाण्यांकडे शेतकऱ्यांचा मोठा कल असल्याचे दिसत आहे.
आंतरपीक प्रात्यक्षिकासाठीही अनेक शेतकरी उत्सुक दिसत असून दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज या योजनेसाठी आलेले आहेत.
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज
प्रमाणित बियाणे वितरण २८७४३
प्रात्यक्षिक बियाणे वितरण ६३३८
आंतरपीक प्रात्यक्षिक बियाणे ७४९६
मिनी किट वाटप १७२१
सर्वाधिक अर्ज प्रमाणित बियाण्यांसाठी
शेतकऱ्यांना महाबीजच्या वाणाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार असल्याने सोयाबीन उत्पादकांनी यासाठी सर्वाधिक अर्ज केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने यासाठीच अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही अनेकांनी या अनुदानित बियाण्यांचा वापर केला असून, यंदा ऑनलाईनमुळे घरबसल्या अर्ज करण्याची सोय असल्याने अनेकांना लाभाची अपेक्षा आहे.
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
मी सोयाबीन बियाण्यांसाठी अर्ज केला आहे. ऑनलाईन अर्ज करताना अनेक अडचणी आल्या. मात्र दोन हेक्टरसाठी लागणारे बियाणे मिळेल, अशी अपेक्षा आहे. आता सोडत कधी होईल याकडे लक्ष लागलेले आहे. एसएमएस येईल असे सांगितले. मात्र तो अजून आलेला नाही.
- प्रकाश दौलतराव काळे, शेतकरी
मी सोयाबीनच्या पाच बॅगांसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. महाबीजच्या बियाण्यांसाठी अर्ज केला आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून अर्ज करूनही अजून सोडत नाही. आता पावसाळा तोंडावर आला आहे. ही प्रक्रिया केल्यावर पुन्हा परमिट, बियाणे आणण्यास वेळ लागणार आहे. ती लवकर झाली पाहिजे.
- देवीदास ढेपे, साळवा
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे
जर ऑनलाईन सोडतीत शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे मिळणार असेल तर तसा संदेश येणार आहे. तो आल्यावर लॉटरी लागल्याचे पक्के होणार आहे. त्याची यादी कृषी सहायकांकडे येईल, असे कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.
एसएमएस आला तर..
एसएमएस आला तर शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकांशी संपर्क साधायचा आहे. ते परमिट व ज्या दुकानदाराकडून बियाणे घ्यायचे त्याचे नाव देणार आहेत. वेगवेगळ्या दुकानांवर लाभार्थ्यांना पाठविले जाणार आहे.