हिंगोली जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा तिढा यंदा सुटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 07:49 PM2020-02-26T19:49:02+5:302020-02-26T19:53:49+5:30
८0 गावांची या योजनांवर भिस्त
हिंगोली : जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांपैकी गाडीबोरी योजनेचे काम पूर्ण झाले असून सिद्धेश्वर व पुरजळचे काम सुरू आहे. तर मोरवाडी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी गेला आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगल्या पर्जन्यामुळे अजूनतरी कुठे टंचाईच्या झळा जाणवत नाहीत. मात्र आता हळूहळू उन्हाचा कडाका वाढत चालला असल्याने टंचाईकडे वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांवर जवळपास ८0 पेक्षा जास्त गावांचा भार असल्याने या योजना सुरू असल्या तरीही एवढ्या गावांचा प्रश्न एका झटक्यात मिटू शकतो. यामध्ये पुरजळ प्रादेशिक योजनेचे काम सुरू आहे. या योजनेखाली औंढा व वसमत तालुक्यातील तब्बल २0 गावे येतात. ही योजना आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसह सौरपंपावर चालणार आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ५.३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. जलशुद्धीकरण केंद्र व उद्भवाचे काम पूर्ण झाले आहे. पंपिंग मशिनरीचे काम सुरू आहे. नवीन वाहिनीही काही ठिकाणी होत असून पाईप पुरवठा झाला आहे.
सिद्धेश्वर प्रादेशिक योजनेसाठीही ५.३४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती. हे काम जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार आहे. या योजनेत दुरुस्तीसह, सौरपंप व इतर बाबींचा समावेश आहे. मात्र यातील २६ पैकी १३ गावेच पुनरुज्जीवन योजनेत सहभागी होणार आहेत. ही योजना दुरुस्ती निविदा स्तरात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी १0.११ कोटींचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. अद्याप त्याला मंजुरीच मिळाली नाही. तर ८ गावे गाडीबोरी तिखाडी योजनेत आता ६ गावेच सहभागी राहणार आहेत. उर्वरित दोन गावे यातून वगळली आहेत. या योजनेच्या दुरुस्तीसाठी ४६ लाखांची मंजुरी मिळाली होती. यात जल वाहिनी दुरुस्ती, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी दुरुस्ती, उंच खांबावरील दोन जलकुंभ आदी कामे करून दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
मुख्यमंत्री पेयजलमध्येही कामे
जिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेतीलही काही कामे सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, वारंगा फाटा, वसमत तालुक्यातील सोमठाणा, औंढा तालुक्यातील येहळेगाव येथील कामांचा समावेश आहे. यात नांदापूर व वारंगा येथील कामे प्रगतीपथावर आहेत. सोमठाणा येथील काही दिवसांपूर्वीच सुरू झाले. येहळेगाव सोळंके येथील कामही अंतिम टप्प्याकडे आहे.