‘जलेश्वर’ तलावाच्या काठची अतिक्रमणे हटविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 07:11 PM2020-02-12T19:11:57+5:302020-02-12T19:13:15+5:30
शहरातील जलेश्वर तलाव सुशोभीकरण
हिंगोली : जलेश्वर तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत १० फेबु्रवारी रोजी परत एक बैठक पार पडली. नोटिस बजावूनही अतिक्रमण हटविले जात नसल्याने आता महसूल प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी अतिक्रमण केलेल्या जवळपास १९५ घरांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
हिंगोलीतील जलेश्वर तलाव सुशोभिकरणासाठी नगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. परंतु शुशोभिकरणासाठी तलावाच्या काठावरील अतिक्रमणाचा अडसर येत असून अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नोटिसाही पाठविल्या आहेत. परंतु अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमणधारकांसाठी जागा खरेदी करून त्यांना घरकुल योजनेतून लाभ दिला जाईल, असे वेळोवेळी आश्वासनही नगरपालिकेकडून देण्यात आले होते. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा पालिकेने प्रस्तावही पाठविला आहे. परंतु सदर प्रस्ताव थंड बस्त्यातच आहे. मात्र आता महसूल प्रशासनाकडून जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जलद गतिने हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. नुकतीच अतिक्रमण हटविण्याबाबत बैठक पार पडल्याने आता प्रत्यक्षात कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. तलावाकाठावरील अतिक्रमण हटविले जाणार असल्यामुळे मात्र ‘आम्ही जावे तरी कुठे?’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आ. तान्हाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची भेट घेतली होती. यावेळी जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. जलेश्वर तलाव सुशोभिकरणात अतिक्रमणामुळे अडथळा होत असल्याने येथील विकासकामे रखडली आहेत.
हिंगोली येथील जलेश्वर तलावाच्या विकासाकरीता अतिक्रमण हटविणेबाबत महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे याबाबत हिंगोली येथील तहसीलदारांनी १९५ अतिक्रमणधारक कुटुंबांना नोटीस दिली. परंतु अद्याप अतिक्रमण हटले नसल्याने आता महसूल प्रशासन येथील घरांवर बुलडोजर चालविणार आहे. त्यामुळे येथील शेकडो नागरिक बेघर होणार आहेत. नव्यानेही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली. ही अतिक्रमणेही हटविणे तेवढेच गरजेचे आहे.
‘त्या’ ठरावाची चर्चा
या अतिक्रमणग्रस्तांना हक्काचे घर मिळावे, यासाठी न.प.ने जागा भूसंपादन करण्याची निविदा मागविली होती. मात्र त्यापेक्षा कमी दरात शहरात जागा मिळू शकते. त्यामुळे या ठरावास विरोध झाला होता. तरीही हाच ठराव पुढे रेटल्याचा आरोप होत असून भविष्यात पुन्हा विरोधाची शक्यता दिसत आहे.
बेघर झाल्यावर आम्ही जावे कुठे ?
येथील तलावाकाठावर मागील ३० ते ४० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु प्रशासनाकडून नोटीस पाठविल्याने आम्ही बेघर झाल्यास जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमण धारकांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरपालिकेकडून प्रस्ताव पाठविला आहे. जे जुने अतिक्रमणधारक आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, जलेश्वर तलावकाठावरील महसूलच्या जागेतील अतिक्रमण लवकरच हटविले जाणार आहे. संबंधितांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यांना नेहमी संधी देण्यात आली होती. मात्र अद्याप स्वत:हून कोणी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आता नियमानुसार संबंधित यंत्रणेद्वारे लवकरच अतिक्रमण हटविले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.