हंगामी वसतिगृह स्थापन होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:01 AM2018-10-21T00:01:28+5:302018-10-21T00:01:49+5:30
एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.
ऊसतोडणीची वेळ तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कामगारांचे जथ्थे स्थलांतरासाठी सज्ज होऊ लागले आहेत. ऊसतोडणीसाठी साधारणपणे आॅक्टोबरपासून ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरास सुरुवात होते. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. शासनाच्या या धोरणामुळे आता हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियांचे शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता स्थलांतरित कुटुंबियाचे पाल्य नातेवाईकांकडे ठेवले जातील, अशी माहिती आहे.
कार्यशाळा : बालरक्षकांना प्रशिक्षण
फसवेगिरीला आळा बसावा यासाठी हंगामी वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले. काही वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याने बायोमेट्रिक यंत्राद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. हंगामी वसतिगृहांची योजना गरजूंपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे.
जिल्ह्यात बालरक्षकांची चळवळ गतिमान करून २०१८-१९ मध्ये एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी तसेच हंगामी वसतीगृहाविना स्थलांतरण रोखण्याच्या शिक्षणाधिकाºयांनी सूचना दिल्या आहेत.