पोलीस दलात बदल्यांचे वारेे; बाळापूर, हट्ट्यासाठी अनेकांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:29+5:302021-07-08T04:20:29+5:30
अधिकाऱ्यांप्रमाणेच कर्मचाऱ्यांतही बाळापूर, कुरुंदा, हट्टा, सेनगाव या ठाण्यांची क्रेझ आहे. आधी या ठिकाणी कोणी जायला तयार नसायचे. आता ट्रेंड ...
अधिकाऱ्यांप्रमाणेच कर्मचाऱ्यांतही बाळापूर, कुरुंदा, हट्टा, सेनगाव या ठाण्यांची क्रेझ आहे. आधी या ठिकाणी कोणी जायला तयार नसायचे. आता ट्रेंड बदलत आहे. या ठाण्यांसाठी फिल्डिंग लावण्याची तयारी आहे. गाव जवळ करण्यासाठी किंवा अशा ठिकाणी राहून इतर व्यवसायही सांभाळता येतात म्हणून काहींचा अशा ठिकाणी जाण्याकडे कल दिसत आहे. मात्र पोलीस अधीक्षक के. राकेश कलासागर रुजू होईपर्यंत बदल्या होण्याची आशा धुसर दिसत आहे. मागच्यापेक्षा जास्त म्हणजे १८० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता आहे.
१८० कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या
कोणत्या उपविभागातून किती?
पोलीस मुख्यालय ३५
हिंगोली ४५
वसमत ४०
हिंगोली ग्रामीण ३५
मागच्यावेळी १५ टक्के बदल्यांचे निकष होते. यावेळी प्रशासकीय व विनंती दोन्हींनाही संधी आहे. त्यामुळे जास्त बदल्यांची शक्यता आहे.
या तीन ठाण्यांना पसंती...
आखाडा बाळापूर : या पोलीस ठाण्याला दोन चौक्या आहेत. असे ठिकाण मिळाले तर तेथे जाऊन अधिकाऱ्याच्याच थाटात राहता येते. त्यामुळे पसंती जास्त आहे.
हट्टा/ कुरुंदा : वरिष्ठांचे दुर्लक्ष असलेल्या या ठाण्यांच्या भागात स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग करता येते. शिवाय पोलीस चौक्याही आहेत. त्यामुळे स्वतंत्र प्रभाराची अनुभूती घेण्यासाठी चढाओढ असते.
वसमत : या भागातील अनेकांची पोलीस दलात भरती झालेली आहे. सुपीक जमिनीच्या या पट्ट्यात घरची शेती सांभाळून नोकरीकडे अनेकांचा कल असतो.
या ठाण्यात, नको रे बाबा!
सेनगाव : दुर्गम भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या सेनगाव ठाण्यात जाण्याची कोणाची तयारी नसते. एक तर सुविधांचा अभाव आणि कायम वादही घडतात.
गोरेगाव : हे ठाणे म्हणजे कधी अतिशय शांत, तर कधी एकदम असंवेदनशील. शिवाय राजकीय माहेरघराचा भाग असल्याने यापासून दूर राहणेच अनेकजण पसंत करतात.
बासंबा : या ठाण्यांतर्गत येणारा भाग हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय विचित्र आहे. त्यावर नियंत्रण ठेवणेच अवघड. शिवाय हिंगोली शहरातील बंदोबस्ताची डोकेदुखी कायम असते.