हिंगोली लोकसभेत वाहतेय महाविकास आघाडीचे वारे; सहाही विधानसभांमध्ये आघाडीला मताधिक्य
By विजय पाटील | Published: June 6, 2024 04:59 PM2024-06-06T16:59:20+5:302024-06-06T16:59:31+5:30
महायुतीचा विधानसभेचा प्रवास अधिक खडतर होणार आहे.
हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभांमध्ये कमी-अधिक प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी काळातील राजकारणाची दिशा बदलत असून वारे कुणीकडे वाहतेय याचा अंदाज येत आहे.
हिंगोली लोकसभेत विद्यमान खा. हेमंत पाटील यांचे जाहीर केलेले तिकीट कापून शिंदेसेनेने नवा चेहरा म्हणून बाबूराव कदम यांना मैदानात उतरविले. कदम मैदान गाजवतील, असे पक्षाला अपेक्षित होते. मोठी रसद आणि पाच आमदारांचे बळ असल्याने अतिआत्मविश्वास होता. पाटील यांच्या रणनीतीवरही पक्षाने विश्वास ठेवला नाही. पाटील यांना त्यांच्या पक्षाचेच कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांच्यासह हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, उमरखेडचे आ. नामदेव ससाणे, किनवटचे आ. भीमराव केराम यांनी विरोध केला. वसमतचे आ. राजू नवघरे यांच्यासोबत तर पाटील यांचे आधीच जमत नव्हते. आता पाटील पुन्हा हिंगोली लोकसभेत सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर पाटील यांचा विरोध या मंडळींना परवडणारा नाही. आधीच महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार झुकला आहे. त्यात या वादाचे पडसाद उमटले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही धक्का बसण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. महायुतीचा विधानसभेचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत आधीचे लोकसभेचे ट्रेंड कायम राहिले होते. त्यामुळे यावेळीही तसे झाले तर पाटील यांनी कुणाला विरोध केला नाही तरीही विद्यमान आमदारांना किनारा गाठणे अवघड आहे. वैयक्तिक किमया साधली तर भाग वेगळा.
मागच्यावेळी हेमंत पाटील यांना २ लाख ७५ हजारांवर मताधिक्य होते. शिंदेसेनेला तरीही १ लाख ८ हजारांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसच्या मतांचा फायदा उद्धवसेनेला झाल्याचे दिसत आहे तर त्यांच्यातील एकजुटीचे दर्शनही यातून घडले. याशिवाय मराठा आरक्षणाचा चिघळलेला मुद्दा आघाडीच्या पथ्यावर पडला. मुस्लीम समाजाने भाजपवरची नाराजी मतदानातून स्पष्ट केली. संविधान बचावने काही प्रमाणात दलित मतेही वळली तर मणिपूरमुळे आदिवासी मतांनीही आघाडीच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे डझनभर बड्या नेत्यांनी सभा घेऊनही महायुतीला पराभवाचा हादरा बसला.
वंचित फॅक्टरही दिसला
यावेळी वंचित फॅक्टरचा फटका महायुतीला बसला. मागच्या लोकसभेला वंचितने १ लाख ७५ हजार ५१ मते घेतली होती. यंदा चौदा हजाराने घट झाली. वंचितचे बी. डी. चव्हाण यांना १ लाख ६१ हजार ८१४ मते मिळाली. त्यामुळे इतरत्र हा फॅक्टर दिसला नसला तरीही हिंगोली लोकसभेत तो दिसला. विधानसभेला या भागात तरी पुन्हा तो त्रासदायक ठरणार आहे.
हिंगोली लोकसभेत प्रमुख उमेदवारांची मते
विधानसभा नागेश आष्टीकर बाबूराव कदम बी. डी. चव्हाण
उमरखेड ८२४३५ ७५०९० १९२१७
किनवट ७६५६७ ६२६३९ १८११३
हदगाव ७५३८९ ७३७५१ २४७८३
वसमत ८४६४६ ५४०९६ ३४२०३
कळमनुरी ८४१२० ६३१०० ३४१४५
हिंगोली ८७२७५ ५३९२३ ३०८६३
पोस्टल २१०३ १३३४ ४९०
एकूण ४९२५३५ ३८३९३३ १६१८१४