आधी पगार नंतरच माघार; प्राध्यापकांचे राज्यभर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:54 PM2020-06-01T16:54:16+5:302020-06-01T16:56:18+5:30
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून उपोषण केले जात आहे.
हिंगोली : प्राध्यापकांना त्यांच्या हक्काचा पगार मिळावा यासाठी १ जून पासून राज्यभर घरात बसून उपोषण सुरू केले आहे. राज्यातील जवळपास २२५०० प्राध्यापक उपोषणात सहभागी झाले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील ३०० प्राध्यापकांनी यात सहभाग नोंदविला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून उपोषण केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेचे राज्यातील उच्च माध्यमिक प्राध्यापक मागील वीस वर्षांपासून एक रुपयाही पगार न घेता विद्यादानाचे कार्य करीत आहेत. हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने पुकाराल्याने सप्टेंबर २०१९ रोजी शासनाकडून (१४६ +१६३८) शाळा घोषित करण्यात आल्या व १ एप्रिल २०१९ पासून या प्राध्यापकांना २० टक्के अनुदान जाहीर केले. त्यानंतर जवळपास १०७ कोटींचा निधी मंजूरही करून घेतला. त्यानंतर पुढील सर्व किचकट प्रक्रिया पूर्ण करून देखील मंजूर झालेला निधी वितरणाचा आदेश शासनाने अद्याप निर्गमित केला नाही. त्यामुळे शासन आदेश त्वरित निर्गमित करून अघोषित शाळा महाविद्यालयांना घोषित करावे व अनुदान द्यावे. प्राध्यापकांना शासनाने न्याय द्यावा. विशेष म्हणजे कोरोना संकटाचे निमित्त करून निधी वितरणाचा आदेश काढण्यास दिरंगाई केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे.
अनेकांनी आत्महत्या केल्या
याकामी होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून नैराश्यातून राज्यभरात जवळपास ९५ शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच याच दिरंगाईमुळे पाच शिक्षकांचा तणावाखाली येऊन मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप शासन गंभीरतेने दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे प्राध्यापकांच्या मागण्यां तात्काळ पूर्ण कराव्यात व न्याय द्यावा यासाठी राज्यभर उपोषण सुरू केल्याची माहिती प्रा. आशिष इंगळे यांनी दिली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक कमवी शाळा कृती संघटनेचे हिंंगोली जिल्हाध्यक्ष प्रा.आशिष इंगळे, कार्याध्यक्ष प्रा. पंडित डाखोरे, प्रा. सुनील डुकरे, प्रा. बालाजी जांबूतकर, प्रा. सुनील जगताप, प्रा.संतोष घुंगरे, प्रा. मालवतकर, प्रा.विष्णू उबाळे, प्रा.गौतम दिपके, प्रा. प्रशांत चाटसे आदींना दिला आहे.