रजा न टाकताच जि. प. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:33 AM2021-08-28T04:33:06+5:302021-08-28T04:33:06+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त असून मुख्य कार्यकारी अधिकारीच प्रभारी असल्याने कर्मचारीही गैरफायदा घेत आहेत. शासनाने आधीच ...
हिंगोली : जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त असून मुख्य कार्यकारी अधिकारीच प्रभारी असल्याने कर्मचारीही गैरफायदा घेत आहेत. शासनाने आधीच पाच दिवसांचा आठवडा केला असताना, शुक्रवारी दुपारीच जिल्हा परिषद रिकामी झाल्याचे चित्र होते. पंधरा ते वीस जण तर रजा न टाकताच तिरुपतीला बालाजी दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचा कारभार रिक्त पदांमुळे ढेपाळत चालला आहे. मागील काही दिवसांपासून यावर अनेकदा चर्चा झडत आहे. तीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह दोन कार्यकारी अभियंता, समाजकल्याण, प्रकल्प संचालक, वित्त व लेखा अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मग्रारोहयो बीडीओ अशी महत्त्वाचीच अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. सध्या तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदच रिक्त आहे. राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीनंतर येथे संजय दैने यांची नियुक्ती तर झाली, मात्र ते अद्याप रुजू झालेले नाहीत. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. सामान्यांची कामे होणार तरी कशी? असा सवाल केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जि. प.त एकही अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी आ. संतोष बांगर यांच्याकडे गेल्यानंतर, त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे तक्रार केली. पाच दिवसांचा आठवडा करूनही लोक शुक्रवारी रजा न टाकता गायब होत असतील, तर यावर कठोर कारवाईची मागणी केली. याची दखल घेण्याचे आश्वासन पापळकर यांनी दिले. मात्र तसे काही होईल, अशी सुतराम शक्यता नाही.
हा गंभीर प्रकार
जिल्हा परिषदेच्या इतिहासात अध्यक्ष म्हणून मलाच या विषयावरून प्रशासनाला जाब विचारावा लागणे, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया जि. प. अध्यक्ष गणाजी बेले यांनी दिली. कर्मचारीच नव्हे, अधिकारीही असे बेजबाबदारपणे वागू लागले, तर बोलायचे तरी कोणाला? आधीच रिक्त पदे असताना, रजा न टाकता बेजबाबदारपणे निघून जाणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे ते म्हणाले.