हिंगोलीत खून प्रकरणातील साक्षीदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:36 IST2018-06-30T14:35:57+5:302018-06-30T14:36:48+5:30
कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत खून प्रकरणातील साक्षीदाराची आत्महत्या
हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पंक्चर काढणाऱ्या साहिल इसाक सिद्दीकी यांचा व्यावसायिक स्पर्धेतून तीन दिवसांपूर्वी खून झाला होता. हा खून स्वत: डोळ्याने पाहिल्याची साक्ष मिलिंदने पोलिसांना दिली होती. त्यामुळे हा एकमेव साक्षीदार महत्त्वाचा समजला होता. मिलींद हा रात्री ढाब्यावर काम करतो. त्याचे घर गावच्या टोकाला आहे. तो घरी एकटाच होता. भावाकडे जेवायलाही आला नसल्याने त्याची आई वच्छलाबाई घुगे या घरी गेल्या, तर मिलींद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
खुनाच्या तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. नेमकी ही हत्या की आत्महत्या याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. घटनास्थळी गोरेगाव पोलीस दाखल झाले असून, प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत रात्री आठ वाजेपर्यंत गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.