वाघजळीत गॅस्ट्रोने महिला दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:55 PM2018-07-06T23:55:47+5:302018-07-06T23:56:02+5:30
तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे.२0 ते २५ जणांना याची लागण झाली आहे. यामुळेच गुरुवारी रात्री एक महिला दगावल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील वाघजाळी येथे दूषित पाणी व घाणीच्या साम्राज्याने तीन दिवसांपासून गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात जुलाब व उलट्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने ५ जुलै रोजी गॅस्ट्रोच्या आजाराने गीताबाई तांबिले (५०) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
गावातील २0 ते २५ जणांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामध्ये गौकर्णा बाबाराव तांबिले (३०), कल्पना ध्रुव तांबिले (२५), भागवत काशीराम तांबिले (३६), माधव सोनुने (४२), हरिदास अवचार (४६) यांच्यासह अनेक रुग्णांना गॅस्ट्रो झाला आहे. काहींनी सेनगाव, रिसोड, हिंगोली आदी ठिकाणची खाजगी रुग्णालये जवळ केली आहेत.
आरोग्य उपकेंद्र कुलूपबंदच
एक महिला दगावली तरीही आरोग्य विभाग बेफिकीर आहे. गावातच प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र बंद आहे. मात्र येथे एकही आरोग्य कर्मचारी कार्यरत नसल्याने ते कुलूपबंद आहे. अआरोग्य विभागाची कोणतीही यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. त्याचबरोबर वेळेवर उपचार मिळाले असते तर महिलेला वाचवता आले, असते अशी खंत ओमप्रकाश तांबिले यांनी व्यक्त केली. यासंबधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्याशी संपर्क साधला गावात ७ जुलै रोजी साखरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक पाठविले असून बाधित रुग्णांवर उपचार तातडीने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.