कोरोना लसीकरणात महिला पुरुषांपेक्षा मागेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:23+5:302021-06-16T04:39:23+5:30
हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये ...
हिंगोली जिल्ह्यात १८ वर्षांपासून पुढील लोकसंख्या जवळपास १० लाखांच्या घरात जाणारी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करायचे आहे. यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातच चार ते साडेचार लाख लोकसंख्या असून सध्या त्यांनाच लसीकरणाला परवानगी नाही;मात्र उर्वरित लोकसंख्या ही ५० टक्के आहे. त्यांनाच अधिक धोका असल्याने त्यांनी लसीकरण करून घेणे जास्त गरजेचे आहे. यासाठी वारंवार जनजागृती करण्यात येत आहे; मात्र तरीही त्याला प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागातील जनता सध्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे. तर शहरी भागात मात्र जनता सुज्ञ असूनही वेगवेगळ्या अफवांना बळी पडत असल्याचे दिसत आहे. त्यातच मागील आठ दिवसांत नाणे अंगाला चिटकण्याचे एक-दोन प्रकार समोर आले आणि उरला-सुरला उत्साहही संपल्याचे दिसत आहे. दुसरीकडे तीन व्हायलही संपत नसल्याने लसीचे डोस तसेच पडून राहण्यापेक्षा तरुणांना लस देण्याची वेळ या केंद्रांवर येत आहे. काही केंद्रांवर तर नंतर हे व्हायल वायाच जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा कहर संपला असे न समजता लसीकरण करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ही लस घेतल्यावर ताप येते, अशक्तपणा येतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे लस घेण्याची भीती वाटत आहे;मात्र ती लवकरच घेणार आहे.
-केशव घनतोडे, केंद्रा बु.
आता शेताची कामे सुरू आहेत. ताप आला तर कामे बुडतील म्हणून लस घेतली नाही. आधी ही लस मिळत नव्हती म्हणून घेता आली नाही.
-पंचफुलाबाई मुधळकर, मोप
ही लस घेतलेल्यांना नंतर ताप आला. काहीजण आजारी पडले. त्यामुळे ही लस घेण्यासाठी भीती वाटत आहे. त्यामुळे लस घेतली नाही.
-पुण्यरथाबाई पठाडे, कानरखेडा बु.