कर्मकांडाच्या अवडंबरातून स्त्रियांनी बाहेर यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:24+5:302021-01-08T05:38:24+5:30

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. ...

Women should come out of the extravagance of rituals | कर्मकांडाच्या अवडंबरातून स्त्रियांनी बाहेर यावे

कर्मकांडाच्या अवडंबरातून स्त्रियांनी बाहेर यावे

Next

हिंगोली: मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले या महानायिकांनी तत्कालीन परिस्थितीत कर्मकांडाच्या व धर्मसत्तेच्या विरोधात जावून सर्वसामान्यांसाठी लढा उभा केला. या संघर्षातून महिलांनी प्रेरणा घेवून विज्ञानवादी जगात जगणे गरजेचे आहे, पण आजही २१ व्या शतकातील स्वत:ला सुशिक्षित समजणाऱ्या अनेक महिला कर्मकांडात बुडालेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर महिलांनी यातून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन व्याख्यात्या सीमाताई बोके यांनी केले. यंदा कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या फेसबुक पेजवर व्याख्यानाचे प्रसारण करण्यात आले. तत्पूर्वी येथील राजे संभाजी महाविद्यालयात मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीताई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष ज्योतीताई कोथळकर या होत्या. उद्‌घाटक कर सहाय्यक सरिता कदम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सदस्या वंदनाताई आखरे, जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर, प्रायोजक वर्षाताई सरनाईक यांची उपस्थिती होती.

व्याख्यात्या बोके म्हणाल्या, इतिहासकाळात जिजाऊ, सावित्री, रमाई, मैत्री, गार्गी अशा महानायिकांनी महिलांचा इतिहास कर्तृत्वाने उज्ज्वल केला आहे. सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या विरोधात जावून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, पण आपण आज त्यांच्या कार्याची जाणीव विसरलो आहोत. भारतात चेंडू उडविणाऱ्यांना व गाणे म्हणणाऱ्यांना भारतरत्न दिला जातो. पण सावित्रीबाई फुलेंना दिला जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. महिलांनी मनाच्या गुलामगिरीतून बाहेर आले पाहिजे, स्त्रियांमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे. याची जाणीव स्त्रियांनी ठेवणे गरजेचे आहे. स्त्री कधीही स्वत:साठी जगली नाही. ती कायम कुटुंब, समाजासाठी जगत असते. त्यामुळे स्त्रियांनी स्व:हित पाहत आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवास, तापास, कर्मकांड, अंधश्रध्देला बळी न पडता विज्ञानवादी जीवन जगले पाहिजे. जिजाऊ -सावित्रींचा वसा पुढे चालवायचा असेल तर संविधानाने दिलेले हक्क व अधिकार स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा शिंदे, अनुराधा पवार-गायकवाड, जिजाऊवंदना उमाताई जगताप, प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा राजश्रीताई क्षीरसागर, व्याख्यात्यांचा परिचय सुषमाताई देशमुख तर वृषालीताई पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Women should come out of the extravagance of rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.