रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
By प्रसाद आर्वीकर | Published: August 31, 2024 12:49 PM2024-08-31T12:49:52+5:302024-08-31T12:49:52+5:30
गावाला नाही स्मशानभूमी, त्यामुळे अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागतो, मात्र, शेती नसलेल्या कुटुंबांची मोठी अडचण होत आहे
- दिलीप कावरखे
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील नागमाथा येथील स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी गोरेगाव ते रिसोड मार्गावर सरण रचत गावात मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत ५० ते ६० कुटुंब संख्या असलेल्या नागमाथा गावात स्मशानभूमीचा प्रश्न पूर्वीपासून दुर्लक्षित आहे. परिणामी गावात मरण पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागत असून, शेती नसलेल्या कुटुंबांना इतर शेतकऱ्यांना विनंती करीत त्यांच्या शेतात अंत्यविधी करावा लागतो. अशा विदारक परिस्थिचा सामाना गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांकडून वेळोवेळी स्मशानभूमीची मागणी केली. मात्र केवळ आश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात मात्र कायम दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी स्मशानभूमीचा प्रश्न कायम राहिला आहे.
३१ ऑगस्ट रोजी नागमाथा येथील त्र्यबंक महादजी गुव्हाडे (७०) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा? असा प्रश्न निर्माण झाला असता नागमाथा येथील ग्रामस्थांकडून गोरेगाव ते रिसोड मार्गावरच सरण रचत रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून नागमाथा गावातील सर्वच महिला व पुरुष ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने गोरेगाव, रिसोड केंद्रा बु. कडे जाणाऱ्या तीन ते चार एसटी बस गाड्यांसह टॅक्सी, जीप, दुचाकी आदी वाहने जागेवर उभी राहिल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
ही माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांसह तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, राहुल खिल्लारीसह काही कार्यकर्त्यांनी येथे येऊन ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. संबंधित अधिकाऱ्यांकडून स्मशानभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी नसता मयतांचे मुले व बाहेर गावातील नातेवाईक आल्यानंतर रस्त्यावरच अंत्यविधी करणार असल्याचा पवित्रा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी घेतला. सकाळी ११:३० पर्यंत ग्रामस्थ रस्त्यावरच ठाण मांडून होते.
जागेची पाहणी सुरु
सकाळी ११:३० च्या सुमारास नायब तहसीलदार कारगुडे, ग्रामविकास अधिकारी जी.एन. सालेगावकर, सहायक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, तलाठी प्रदीप इंगोले, सरपंच पती दासराव कावरखे आदी गावात पोहोचले. स्मशानभूमीसाठी जागेची पाहणी करण्याची धडपड यावेळी सुरु होती.
सर्वजण केवळ आश्वासने देऊन मोकळे
पूर्वीपासून स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्याने शेतामध्ये अंत्यविधी करावा लागतो; परंतु ज्या कुटुंबांना शेती नाही त्यांनी अंत्यविधी कुठे करावा? असा प्रश्न आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी केवळ आश्वासने देऊन मोकळे होत आहेत.
- कोंडीबा काशीराम खटके, ग्रामस्थ नागमाथा
रस्त्यावरच अंत्यविधी करणार
मागणी करूनही गावात स्मशानभूमी उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी, बीडीओ, तहसीलदार आदींना संपर्क साधला मात्र तीन तासापासून अद्याप वरील पैकी कोणीही आले नाही. स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न नाही सोडवल्यास दुपारी दिड वाजेच्या सुमारास रस्त्यावरच अंत्यविधी केला जाणार आहे.
- अनिल तिखडके, ग्रामस्थ नागमाथा