चार गावांतील आराखड्याची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:48 PM2018-03-10T23:48:18+5:302018-03-10T23:48:30+5:30
मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दुर्गम गावांसाठी मोठ-मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमातून तसेच शासन योजनांच्या वापरातून ही योजना पुढे आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील १ हजार गावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, खिल्लार या गावांत ही कामे होणार आहेत. यात निवडलेल्या गावात दोन वर्षांत सर्व कामे करणे अपेक्षित आहे. अशा दुर्गम गावात केवळ भौतिक सुविधाच्या उभ्या करायच्या नसून सामाजिक, आर्थिक उत्थानासाठीही कामे करायची आहेत. यात रोहयो, जि.प., बांधकाम, वन, कृषी अशा विविध विभागांचाही सहभाग घेतला जाणार आहे. शिवाय ही गावे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतही असून यातील कामेही होणार आहेत. तर जेथे कोणत्याच योजनेतून काम घेणे शक्य नाही, असे काम सीएसआरमधून कंपन्यांमार्फत करून घेणार आहेत. एवढेच नव्हे, तर या आराखड्यानुसार एखादे गावच एखादी कंपनी दत्तक घेणार असल्यास त्यांना तसेही कामे करून देण्यास मुभा दिली जाणार आहे.
जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर याबाबतचा आढावा नियमितपणे घेतला जाणार आहे.
या गावांसाठी चार मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दाखल झाले आहेत. ते प्रत्यक्ष गावात राहून आराखडा तयार करतील. त्यात गावांच्या गरजांचा व परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून आराखडा बनविला जाईल. तर १ मेच्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर व्हावा, असे नियोजन केले जात आहे.