महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:52 PM2018-07-06T23:52:22+5:302018-07-06T23:52:38+5:30
जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.
हिंगोली जिल्ह्यात या योजनेत भरघोस उद्दिष्ट मिळालेले आहे. मात्र ही कामे होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकदा ओरड होत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक सभा, बैठकीत यावरून तोंडसुख घेत आहेत. मात्र शासन व प्रशासन दोन्हीही हलायला तयार नाहीत. आधी कामे मंजूर होत नसल्याची बोंब होती. आता मंजूर कामांचा श्रीगणेशाच होत नसल्याची बोंब आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांचीही तीच गत आहे. दहा हजार विहिरींचे उद्दिष्ट असताना ग्रामसभेतून केवळ ९९७0 लाभार्थी निवड झाली. ३९२४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २३८८ कामे चालू आहेत. तर पूर्ण ५४ कामे झाली आहेत. १४८२ कामे सुरूच नाहीत. व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टात ६८७ अर्ज आले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ३ कामेच सुरू झाली आहेत. नाडेप कंपोस्टिंगची ७६८ पैकी ४६६ कामे मंजूर होती. यापैकी १५ सुरू असून २ पूर्ण झाली आहेत. शौचालयाच्या ८७२ पैकी २२६ कामांना मंजुरी दिली असताना १२0 कामेच सुरू आहेत.
शौषखड्ड्यांच्या १८६९ पैकी ८८१ कामांना मंजुरी दिली होती. ४८७ कामेच सुरू झाली. समृद्ध ग्राम योजनेत ७0५ पैकी २६९ कामांना मंजुरु दिली होती. यापैकी २६१ कामे सुरू झाली आहेत.
या योजनेतील कामे सुरू करण्यासाठी सूचनांवर सूचना दिल्या जात आहेत. मात्र तरीही कामे सुरू होत नाहीत. आता पावसाळ्यात काहीच कामे करणे शक्य आहे. यात फळबाग लागवडीचे १८00 चे उद्दिष्ट असून ३६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १४८ कामेच सुरू झाली आहेत.
रोपवाटिकेच्या ६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातील ४ कामे पूर्ण तर ५६ सुरू आहेत. वृक्षलागवडीच्या ३६ प्रस्तावांपैकी २३ ला मंजुरी दिली होती. यापैकी १८ कामे सुरू तर पाच कामे अजूनही सुरू झाली नाहीत.
शेततळ्यांचे उद्दिष्ट ५६00 एवढे आहे. यात ५३२ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव असून ३२२ ला प्रशासकीय मंजुरी दिली. एकही काम सुरू नाही. समृद्ध गाव तलावाचा तर प्रस्तावच नाही.