महावितरणची कामे कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:40 AM2017-11-20T00:40:43+5:302017-11-20T00:41:00+5:30
जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात नागरी वस्त्यांमध्ये सुरळीत व दर्जेदार विजसेवेसाठी ५२ कोटी रुपयांची कामे एकात्मिक वीज विकास व दीनदयाल उपाध्याय नागरी ग्रामज्योती योजनेत सुरू आहेत. मात्र दहा महिन्यांनंतरही यातील कामे २५ टक्केही पूर्ण झाली नसल्याने पंचाईत झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात महावितरणमार्फत दरवर्षी कोट्यवधींची कामे केली जात आहेत. मात्र या सर्व कामांवर नांदेड येथील इन्फ्राच्या अधीक्षक अभियंत्यांकडून नियंत्रण ठेवण्यात येते. स्थानिक ठिकाणी त्यांचे अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाला प्रस्ताव तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीतील कागदी घोडे नाचविणे यापलिकडे सवडही मिळत नाही. तर नांदेड येथील यंत्रणा कधीतरीच या कामांच्या तपासणीला येते. त्यामुळे कंत्राटदारांच्याच भरवशावर ही कामे होतात. यापूर्वी इन्फ्राच्या कामांमध्ये अनेक गावांतील रोहित्रच गायब असल्याचे समोर आले होते. शिवाय अनेक गावांतील वीजवाहिन्याच अजूनही ओढलेल्या नाहीत. एका गावाचे नाव सांगून दुस-याच गावात कामे केल्याचेही प्रकार घडले. यात सबकंत्राटदारांनीही मोठी करामत दाखविली होती. मात्र महावितरणने तरीही कोणताच बोध घेतला नाही. आता श्रावण इलेक्ट्रिक या कंत्राटदारामार्फत ही कामे केली जात आहेत. मात्र या कामांना गतीच नाही. खुद्द जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या कामांसाठी अनेकदा सूचना दिल्या आहेत. ६ जानेवारी २0१७ रोजी यासाठी निविदा निघाल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र आता दहा महिन्यांनंतर शहरात काही ठिकाणी डीपीचे फ्युजबॉक्स, किरकोळ दुरुस्तीचीच कामे झाल्याचे दिसत आहे. ही कामेही सर्वच भागात पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी खांब सरळ करणे, बदलणे, तारा बदलणे या कामांची सुरुवातही झाली नाही. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहरात भूमिगत वीजवाहिन्याचे काम होणार आहे. मात्र या योजनेचाच पत्ता नाही.