सोनोग्राफीचा दुरुपयोग रोखण्यासाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:59 AM2018-03-18T00:59:27+5:302018-03-18T01:00:46+5:30
राज्यात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता, सोनोग्राफी यंत्राचा होत असलेला दुरूपयोगावर प्रतिबंध लावण्यासाठी तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण समान ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी १७ मार्च रोजी कार्यशाळा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यात मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता, सोनोग्राफी यंत्राचा होत असलेला दुरूपयोगावर प्रतिबंध लावण्यासाठी तसेच पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण समान ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी १७ मार्च रोजी कार्यशाळा घेतली.
प्रथम दिपप्रज्वलनाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आकाश कुलकर्णी यांनी पीसीपीएनडीटी कायद्या संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले हिंगोली जिल्ह्याचे २०११ मध्ये १०००:८६८ असे लिंग गुणोत्तराचे प्रमाण घेऊन हे, वाढीविण्यासाठी सदर कायद्याची प्रखरपणे अंमलबजावणी बाबत समुचित प्राधिकारी व सोनोग्राफी केंद्रधारकांना माहिती दिली. तर डॉ. गोपाल कदम यांनी सामाजिक स्तरावर मुलींना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण, स्त्रीयांना देण्यात येणारा दुय्यम दर्जा तसेच मुलगी जन्मल्यापासून तिच्या आरोग्याची काळजी, शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच समाजातील हुंड्याची प्रथा बंद करण्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. डॉ. दिलीप भाले यांनी सर्व सोनोग्राफीधारकांना पीसीपीएनडीटी कायद्याच्या कक्षेत राहून नियमांचे पालन करणे तसेच नवीन सोनोग्राफी केंद्र नोंदणी किंवा नुतनीकरणाची पद्धत, सोनोग्राफी केंद्रावरील आवश्यक बाबी, व यंत्राची माहिती, गर्भवती स्त्रीयांची सोनोग्राफी तपासणीदरम्यान करायची कार्यवाही, मासिक अहवाल याबाबत सविस्तर प्रझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. सुदाम मेहत्रे यांनी समुचित प्राधिकाऱ्यांचे अधिकार, सोनोग्राफी केंद्र तपासणी करावयाची पद्धत, तपासणीदरम्यान त्रुटी आढळुन आल्यास पुढील कार्यवाही याबाबत माहिती सांगितली.
यशस्वीतेसाठी अॅड. सुकेशिनी ढवळे, सुरेश शेवाळे, उद्धव कदम, प्रशांत गिरी, अनुराधा पथरोड, कल्पना लहाडे, राम गाजरे, दिपक लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले लिंग गुणोत्तर लक्षात घेऊन सर्व समुचित प्राधिकारी यांनी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच सर्व सोनोग्राफी केंद्रधारकांना सदर कायद्याचे योग्य रितीने पालन करण्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलींच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात वाढ कशी करता येईल याबाबत मागदर्शन करत, कारवाईच्या सूचना दिल्या.