अनेकांचे संसार उघड्यावर; रमाई घरकुलला दोन वर्षांपासून निधीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:22 PM2020-11-21T17:22:51+5:302020-11-21T17:24:12+5:30
जुने बांधकाम पाडल्याने संसार उघड्यावर आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पदरमोड करून घरकुल बांधले
हिंगोली : रमाई घरकुल योजनेसाठी मागील दोन वर्षांपासून निधी नसल्याने घरकुलांची जवळपास २७४० कामे रखडलेली आहेत. या योजनेतील लाभार्थी मेटाकुटीला आले असून निधीसाठी मात्र काहीच हालचाली दिसत नाहीत.
हिंगोली जिल्ह्यात रमाई घरकुल योजनेत २०१६-१७ ते १९-२० या कालावधीत जिल्ह्याला ६७६६ घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५९४६ जणांनी बांधकामासाठी नोंदणी केली होती. यापैकी ५५५३ जणांच्या जागेवर जाऊन जीओ टॅगिंग करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकासह पडताळणी करून ५४५० जणांची कामे मंजूर करण्यात आली होती. यापैकी ५ हजार जणांना पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. त्यामुळे एवढी कामे शेवटपर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र २०१८-१९ व २० या दोन वर्षांत निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने या लाभार्थ्यांची कामे रखडून पडली. त्याचा परिणाम म्हणून चौथ्या हप्त्यापर्यंत पोहोचलेल्या लाभार्थ्यांची संख्या केवळ १८२७ आहे. यात औंढा १९८, वसमत ३८९, हिंगोली ३५७, कळमनुरी ५१८, सेनगाव ३६५ अशी चौथा हप्ता अदा झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे.
पदरमोड करून पूर्ण केले घरकुल
शासनाकडून निधी मिळाला नसला तरीही जुने बांधकाम पाडल्याने संसार उघड्यावर आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पदरमोड करून घरकुल बांधले त्यामुळे जिल्ह्यात घरकुल पूर्ण झाल्याची संख्या ४०२६ आहे. तर अपूर्ण असलेले २७४० आहेत. आता या घरकुलधारकांना निधीची प्रतीक्षा आहे. अवघ्या १.२० लाखात घर बांधकाम सोपे नाही. त्यात पात्र असल्यास स्वच्छ भारत मिशनकडून१२ हजार तर मग्रारोहयोतून १८ हजार मिळतात. त्यामुळे दीड लाखांपर्यंतची रक्कम मिळते. याचा सर्व लाभार्थ्यांना लाभ होत नाही. काहींनी घर बांधकाम करताना पदरचे पैसे तर टाकले मात्र खाजगी कर्जही काढले आहे. त्यांना आता शासनाकडून मिळणारी रक्कमही मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.
३२ कोटींची आवश्यकता
हिंगोली जिल्ह्यात जवळपास ४०२७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तर १८२७ लाभार्थ्यांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. तर २७४० जणांचे बांधकामच रखडलेले आहे. ज्यांचे बांधकाम राहिले अथवा पुढील हप्ते मिळाले नाही, अशांसाठी ३२ कोटी लागणार आहे. तर शासनने आता दोन वर्षांपूर्वीच्या बांधकामांचा निधी देण्यास सांगितले आहे. त्यामुळे एवढा निधी नजीकच्या काळात या विभागाकडून मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. हा निधी कधी मिळेल, याची प्रतीक्षा लागली आहे.
तालुकानिहाय चित्र
तालुका चाौथा हप्ता पूर्ण अपूर्ण
औंढा नाग. १९८ ४८५ ३७१
वसमत ३८९ ८५१ ४४१
हिंगोली ३५७ ८३९ ६७२
कळमनुरी ५१८ १०५६ ६४५
सेनगाव ३६५ ७९५ ६११
एकूण १८२७ ४०२६ २७४०