कोरोनाचे नियम पाळत साजरा केला जाणार जागतिक लोकसंख्या दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:59+5:302021-07-11T04:20:59+5:30
दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दहा वर्षापासून जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध ...
दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दहा वर्षापासून जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही कोरोना महामारीचे संकट असले कोरोनाचे नियम पाळत जिल्ह्यात कार्यक्रम घेतले जाणार आहेत. माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काळजी घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने ११ जुलै २०२१ हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करावयाचा आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
पहिल्या टप्पात दांपत्य संपर्क पंधरवडा २७ जून ते १० जुलै २०२१ या कालावधीमध्ये घेण्यात आला. यामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात आले, जागतिक लोकसंख्या दिन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जाणार आहे.
लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाची सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या दरम्यान कार्यक्रम राबविताना कोरोना महामारी टाळण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य 'संकट काळातही करूया कुटुंब नियोजनाची तयारी-सक्षम देश व कुटुंबाची ही आहे संपूर्ण जबाबदारी' असे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी व प्रचार जनजागृती करण्यात येणार आहे. येत्या २४ जुलैपर्यंत गाव पातळीवर जागतिक लोकसंख्या दिन प्रभावीपणे राबविला जाणार आहे.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक