चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:38 PM2021-12-24T17:38:46+5:302021-12-24T17:39:54+5:30
सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.
हिंगोली : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक व ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १, हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथे १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २ आणि वसमत तालुक्यातील पिंपळा (चौरे) येथे १ यांचा समावेश आहे.
बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, रामप्रसाद मुडे व ग्रावसेवक, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात यश आले.
तर येथे संपर्क साधावा...
सध्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वयाचा विचार करता बालविवाह होत आहेत. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना बालविवाहास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. गावात अथवा इतर कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अथवा चाईल्ड लाईन (१०९८) या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. बालविवाह रोखण्यासाठी समाजातील कोणताही नागरिक तसेच स्वत: बालक किंवा बालिका व स्वयंसेवी संस्थेने बालविवाह होत असल्यास किंवा बालकांसोबत गैरकृत्य होत असल्यास चाईल्ड लाईनकडे संपर्क साधावा.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, हिंगोली