वाहह...हे तर सोन्याहून पिवळं! हळदीला १९ हजारांचा भाव
By रमेश वाबळे | Published: May 2, 2024 06:22 PM2024-05-02T18:22:51+5:302024-05-02T18:23:47+5:30
हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांतून हळद विक्रीसाठी येत असल्याने आठवडाभरापासून आवक विक्रमी होत आहे.
हिंगोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या उत्पादनात घट झाली; मात्र समाधानकारक मिळत आहे. येथील संत नामदेव मार्केट यार्डात २ मे रोजी दरवाढीची झळाळी मिळाली आणि १९ हजारांपर्यंत भाव गेला.
येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांतून हळद विक्रीसाठी येत असल्याने आठवडाभरापासून आवक विक्रमी होत आहे. ३० एप्रिल रोजी १५ ते १७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली होती. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तम मार्केट यार्ड बंद होते. त्यानंतर २ मे रोजी हळदीची बीट झाली. या दिवशी पुन्हा दरवाढीची झळाळी मिळाल्याने १९ हजार रुपयांपर्यंत भाव गेला. तर सरासरी १६ हजार ५०० ते १७ हजार रुपयांदरम्यान भाव राहिला.
आवक वाढत असल्यामुळे भाव किंचित घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हळद तयार आहे, त्यातील बहुतांश शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. तर काहींना अजून भाव वाढण्याची आशा आहे.
सोयाबीन साडेचार हजारांखाली...
उत्पादनात झालेली घट आणि कवडीमोल भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहेत. उत्पादनात घट झाल्याने किमान ६ हजार रुपये भाव मिळेल, अशी आशा होती; मात्र सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही. दरकोंडी कायम राहिल्याने सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. हाती येणाऱ्या उत्पन्नातून लागवडीही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हरभऱ्याची आवक घटली...
यंदा जिल्ह्यात गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा अधिक झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात वाढ झाली. २ मे रोजी मोंढ्यात ४०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार ६०० ते ६ हजार १२० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. तर गव्हाचे उत्पादन यंदा कमी असल्यामुळे भाव तेजीत आहेत. चांगल्या गव्हाला ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे.