हिंगोलीत पोलिस शिपाई पदासाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 29, 2023 07:22 PM2023-03-29T19:22:54+5:302023-03-29T19:23:12+5:30
हिंगोली पोलिस भरती; लेखी परीक्षेसाठी २१९ उमेदवार बोलावले
हिंगोली : येथील नांदेड रोडवरील नवीन पोलिस वसाहतीतील कम्युनिटी हॉलमध्ये २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे.
हिंगोली पोलिस दलात शिपाई पदाच्या २१ जागांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. यासाठी १४३५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यात ११७१ पुरूष तर २६४ महिला उमेदवारांचा समावेश होता. या उमेदवारांची २ ते ४ जानेवारी दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली. यातील २१९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षेकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले होते.
आता लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येथील नांदेड रोडवरील नवीन पोलिस वसाहतीत कम्युनिटी हॉलमध्ये २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता लेखी परीक्षा आयोजित केली आहे. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. पात्र उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या २ तास अगोदर पोहचणे आवश्यक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.