'एसआरटी' विद्यापीठातील तरुण संशोधकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 07:37 PM2021-07-16T19:37:27+5:302021-07-16T19:37:52+5:30
जात पडताळणीच्या कामासाठी तरुण शुक्रवारी सकाळी हिंगोली येथे आला होता.
औंढा नागनाथ : दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये समोरासमोर अपघात होऊन वसमत तालुक्यातील गिरगाव येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना हिंगोली -औंढा महामार्गावरील गलांडी पाटीजवळ सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली. नागोराव अंबादास भाग्यवंत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे एमफील अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थी होता.
वसमत तालुक्यातील गिरगाव येथील नागोराव अंबादास भाग्यवंत ( 32 ) हा युवक नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे मानविहक्क विषयात एमफील उच्च शिक्षण घेत होता. कोरोना प्रादुर्भावामुळे तो गावाकडे आला होता. परंतु, जात पडताळणीच्या कामासाठी नागोराव शुक्रवारी सकाळी हिंगोली येथे आला होता. काम आटोपून परत गावाकडे जात असताना औंढा हिंगोली रोडवरील गलांडी पाटीजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नागोराव गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सह पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार अफसर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकाला औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.