सेनगावात सापडेला मृतदेह अमरावती जिल्ह्यातील तरुणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:46 PM2019-11-02T19:46:15+5:302019-11-02T19:49:32+5:30
जवळपास २५० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या तरुणीच्या मृतदेहाची ओखळ केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून पटली असून खुनाला वाचा फुटली आहे.
सेनगाव:तालुक्यातील हत्ता -साखरा रस्त्यावरील हत्ता पाटी पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील साठवण तलावाच्या पाण्यात सापडलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीचा मृतदेहाची ओळख व्हाट्सएप माध्यमातून पटली असून मयत तरुणी हि अमरावती जिल्ह्यातील धामणी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील हत्ता येथील साठवण तलावाच्या पाण्यात रस्त्याच्या कडेला एका अंदाजे पंचवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह शुक्रवारी आढळला होता. सदर तरुणीचा गळा आवळून खुन करण्यात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्या बरोबर या तरुणीचा मृतदेहाची ओखळ पटविण्याचे कठीण आवाहन सेनगाव पोलिसांसमोर होते. अशा परिस्थितीत तपास अधिकारी फौजदार बाबुराव जाधव यांनी प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवली. व्हाट्सअप चा माध्यमातून तरुणीचा मृतदेहाचे फोटोसह सविस्तर माहिती प्रसारित केली. त्यांच्या या प्रयत्नांना २४ तासाच्या आतच यश मिळाले. सदर मयत तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामधील धामणी या गावची असून तिचे शारदा मांगीलाल बेलसरे असे नाव असल्याचे समोर आले आहे. जवळपास २५० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या तरुणीच्या मृतदेहाची ओखळ केवळ व्हाट्सअप माध्यमातून पटली असून खुनाला वाचा फुटली आहे.
मयत तरुणीचा आई-वडिलांनी सदर मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे सेनगाव पोलिसांशी संपर्क साधून सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा १८ ऑक्टोबर ला इंजिनिअर असलेल्या प्रियकरा समवेत दिल्लीला गेली होती अशी प्राथमिक माहिती नातेवाईकाकडुन मिळाली आहे.
गळा आवळून केला खुन
मयत तरुणीचा गळा आवळून खुनच करण्यात आला असल्याचा अहवाल शवविच्छेदना वैद्यकीय अधिकारी यांनी शुक्रवारी दिला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना मयत तरुणीचा ओखळ पटलाने लवकरच खुन प्रकरणाचा उलगडा होण्याची चिन्ह आहेत.