'तुमचे दागिने छान आहेत, आमच्या नातेवाईकांना दाखवा', गोड बोलून ५० तोळे सोने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:16 PM2024-05-03T12:16:23+5:302024-05-03T12:23:56+5:30
याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी एकास घेतले ताब्यात
- इस्माईल जहागीरदार
वसमत: तुम्ही मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने छान आहेत, आमच्या नातेवाईकांनाही घेयचे आहेत. त्यांना एकदा दाखवा, असे म्हणत घेऊन गेलेले ५० तोळे सोने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहरातील अब्दुल आहद यांनी मुलीच्या लग्नासाठी ५० तोळे सोने (किमत ३४ लाख ९० हजार) खरेदी केले होते. १ एप्रिल रोजी आहद हे त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यावेळी शेजारी असलेल्या संगीता कातोरे (रा. काळीपेट) या महिलेने घेतलेले सोने दाखवा, असा आग्रह धरला. यावरुन आहद व त्यांच्या नातेवाईकांनी ५० तोळे सोने दाखवण्यास दिले. यावेळी संगीता कातोरे यांच्या घरी स.अन्वर व त्यांची पत्नी इशरत बेगम बसलेले होते. या दोघांनी आमच्या नातेवाईकांना पण सोने घ्यायचे आहे ते निजामबाद येथून वसमतला आले आहेत. सध्या जिल्हा परिषद मैदानावर ते आहेत त्यांनाही दागिने दाखवतो, असे म्हंटले.
त्यानंतर संगीता कातोरे यांनी ५० तोळे सोने स. अन्वर यांच्या हातात देत आहद यांना हे सर्व आमच्या विश्वासातील आहेत असे म्हणत त्यांच्यासोबत जिल्हा परिषद मैदानावर जाण्यास सांगितले. येथे आल्यानंतर स. अन्वर स. खैसर, इशरत बेगम स अन्वर ( दोघे रा. नांदेड) यांनी मैदानावरील एका कारमध्ये बसलेल्या असलम व इमरान ( दोघे रा. निजामबाद) यांच्या हातात सोने दिले. सोने पाहण्याच्या बहाणा करत अचानक कार सुरू करून चौघेही तेथून पसार झाले.
आहद यांना फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी संगीता कातोरे यांचे घर गाठले. यावेळी संगीता कातोरे यांनी उडवाउडवीचे उतरे दिली. सोन्याची मागणी केली असता आज उद्या म्हणत सोने दिले नाही. आहद यांनी २ मे रोजी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीवरून संगीता कातोरे (रा. वसमत), स. अन्वर स. खैसर, इशरत बेगम स. अन्वर (रा.नांदेड),असलम, इमरान दोघे (रा निजामबाद) या पाच जणांविरुद्ध विविध कल्मान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने स. अन्वर यास नांदेड येथून गुरुवारी रात्री ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.