'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल
By विजय सरवदे | Published: January 22, 2024 05:44 PM2024-01-22T17:44:03+5:302024-01-22T17:44:35+5:30
मुरुंबा येथे तरुणाची आत्महत्या, आत्महत्येची चिठ्ठी लिहून विषारी द्रव्य केले प्राशन
हिंगोली: शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत वसमत तालुक्यातील मुरुंबा येथील तरुणाने विषारी औषध घेत आत्महत्या केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अनेक वर्षापासून आंदोलन करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,श या नैराशेतून ज्ञानेश्वर संभाजी वारे (वय २२) या तरुणाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली. २१ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यत ज्ञानेश्वर घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या घरच्यांना चिंता लागली होती. यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरच्यांनी केला. याचबरोबर मित्रांनी देखील शोधाशोध सुरु केली. याचदरम्यान ज्ञानेश्वरचा रात्रभर मोबाईल बंद असल्याने कुटुंबाची काळजी वाढत गेली.
२२ जानेवारी सकाळी ज्ञानेश्वरचा चुलत भाऊ शेतात आला. त्यावेळी त्यास शेतात ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळला. यानंतर सदर माहिती वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेहाचा पंचनामा करताना ज्ञानेश्वरच्या खिशात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवलेली मिळाली. महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार अविनाश राठोड करीत आहेत.