गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 6, 2023 04:31 PM2023-09-06T16:31:37+5:302023-09-06T16:32:00+5:30

गोरेगाव परिसरातील हिंगोली रस्त्यावर आंतरवाली येथील घटनेचा टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला.

Youth protest by climbing the tower in Goregaon; Slogans for Maratha reservation | गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

googlenewsNext

- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) :
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले. ६ सप्टेंबर रोजी मराठा तरुणांकडून मोबाईल टॉवरवर चढून निषेध नोंदवण्यात आला. तसेच घोषणाबाजी करीत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. गोरेगाव येथे ३ सप्टेंबर रोजी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर आज येथील श्री गोरेश्वर मंदिरालगत असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून मराठा तरुणांकडून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध म्हणून गृहमंत्र्यांसह सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे अशी मागणी लावून धरीत जालना येथील आंदोलनाला मराठा एकजुटीचा पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संतोष कावरखे, पंजाब कावरखे, रामेश्वर कावरखे, शिवाजी खिल्लारी, उमेश कावरखे, संजय भुरभुरे, संदीप गवळी, दीपक कावरखे, सुनील कावरखे, रमेश कावरखे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आरक्षण दिल्याशिवाय उतरणार नाही
बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा तरुणांनी टॉवरवर चढत मराठा आरक्षण मागणीची घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्यासह गोरेगाव पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळ गाठले. यावेळी काही तरुणांना टॉवरखाली उतरविण्यात यश आले. असे असले तरी नामदेव पतंगे, हर्षल पडघान व इतर कार्यकर्त्यांनी आरक्षणाचा ‘जीआर’ मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, गोरेगाव परिसरातील हिंगोली रस्त्यावर आंतरवाली येथील घटनेचा टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला.

Web Title: Youth protest by climbing the tower in Goregaon; Slogans for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.