सेनगावमध्ये मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:33 PM2018-10-04T18:33:25+5:302018-10-04T18:34:20+5:30
सोयाबीन काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सोयाबीन काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
हाताळा येथील युवक दत्ता सुभाष धामणकर (१९) हा मळणीयंत्रावर रोजंदारीने काम करत होता. एमएच-३८ व्ही- ०४४२ या ट्रॅक्टरला मळणीयंत्र जोडलेले होते. दत्ता सोयाबीन मळणीयंत्रातून काढत असताना त्याच्या डोक्याला बांधलेला रुमाल अचानक यंत्रात अडकला, आणि रुमालाने त्याला मळणीयंत्रात ओढून घेतले. यावेळी दत्ता धामणकर यांचा मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पीएसआय माधव कोरंटलू, बिट जमादार डी.यू. शेळके, टी.के. वंजारे, बी.एम.कुमरेकर, काशीनाथ शिंदे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.