'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

By admin | Published: January 30, 2015 02:53 PM2015-01-30T14:53:48+5:302015-01-30T14:53:48+5:30

येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.

'Yudshi' hits the dead | 'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

'येडशी'तील मारावर काळाची फुंकर

Next

 हिंगोली : /कळमनुरी/ तालुक्यातील येडशी येथे चक्क पोलिसांनाच बदडून काढल्याने पोलिस खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. निदान या प्रकरणात तरी आरोपी लवकर पकडले जातील, असे अपेक्षित असताना पोलिस गप्पगार बसले आहेत.
येडशी येथील यात्रेत कुस्त्यांची दंगल सुरू असताना हा प्रकार घडला होता. आदल्या दिवशी पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना 'प्रसाद' दिला. दुसर्‍या दिवशी हीच मंडळी पोलिसांना प्रसन्न झाली. त्यांनी चक्क पोलिसांकडून सव्याज वसुली केली. ज्यांनी हे कृत्य केले त्यातील अनेक गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. मात्र पोलिसांची त्यांना कुठलीच भीती नाही, हे तेव्हाच अधोरेखित झाले होते. ती भीती का नाही, हे तपासाची गती पाहून लक्षात येत आहे. दुसर्‍या दिवशी गावात आयत्याच सापडलेल्या पाच जणांना पकडले अन् तेवढय़ावरच समाधान मानावे लागले. हा भाग संवेदनशील आहे. पोलिस ठाण्याचा आवाकाही मोठा आहे. शिवाय एकामागून एक प्रकरणांचा धडाकाही तेथेच सुरू आहे. इतर प्रकरणांच्या तपासात पोलिसांची गती मंद असते. निदान त्यांनाच कोणी बकलून काढल्यावर तरी जोमात चक्रे फिरतील, असे अपेक्षित होते. मात्र कातडी गेंड्यांचीच. त्यावर चार-दोन दंडे पडलेही तर फरक काय तो पडणार? असे लोकांना वाटत आहे. तर जणू काही घडलेच नाही, या थाटात पोलिस वावरत आहेत. यात राजकीय दबावाचाही गंध येत आहे. परंतु कर्तव्यदक्षतेचा आव आणणारे व कुठल्याही दबावाला बळी पडत नसल्याचे सांगणारे पोलिस दल त्यामुळे तर चुप्पी साधून नाही? असाही प्रश्न आहे. /(जिल्हा प्रतिनिधी) कुस्त्यांच्या दंगली यात्रांतून बाद! येडशीत कुस्त्यांची दंगल सुरू असताना घडलेल्या प्रकारामुळे वारंगा फाटा परिसरातील अनेक ठिकाणच्या यात्रांतून कुस्त्यांच्या दंगलीच बाद झाल्या आहेत. त्यात वारंगा येथील स्पर्धेचाही समावेश आहे. तोंडापूर, कुर्तडी येथेही तेच घडले. विशेष म्हणजे काही ठिकाणी मल्लच भीतीपोटी आले नाही तर काही ठिकाणी आयोजकांनी नको ती झंझट म्हणून या स्पर्धा घेतल्या नाहीत. केवळ एका घटनेमुळे या स्पर्धांवर परिणाम होत असेल तर ही बाब लाजीरवाणी आहे. पोलिस दलाने याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. येडशीत गमावलेला लोकांचा विश्‍वास परत मिळविण्यासाठी पोलिसांना मात्र कृतीतून सिद्धता दाखवावी लागणार आहे.

Web Title: 'Yudshi' hits the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.